मुंबई - बेळगाव महानगर पालिका निवडणुकीमध्ये भाजपने एक हाती सत्ता मिळवली. यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्र भाजपवरती टीका केली होती. या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले होते. आता पुन्हा फडणवीस यांना राऊत यांनी त्यांच्या शैलीमध्ये प्रत्युत्तर देत आव्हान दिले आहे. फालतू गप्पा मारू नका, बेळगाव हे महाराष्ट्राचेच आहे की नाही ते स्पष्ट करा, असे आव्हान संजय राऊत यांनी फडणवीसांच्या टीकेनंतर भाजपला दिले आहे.
हेही वाचा - NIA च्या चार्जशीटमध्ये काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न; नवाब मलिक यांचा आरोप
- बेळगाव महाराष्ट्राचेच आहे की नाही हे भाजपने सांगावे - राऊत
महाराष्ट्र भाजपने फालतू गप्पा मारू नयेत. बेळगाव महाराष्ट्राचेच आहे की नाही एवढेच त्यांनी आज स्पष्ट करावे..तो कुणाचा काय अहंकार हे नंतर बघू. मराठी एकजुटीचा बेळगावात विजय झालाच पाहिजे असे बोलणे हा अहंकार की मराठी अस्मिता हे 11 कोटी मराठी जनतेलाच ठरवू द्या, असे राऊत म्हणाले.
- संजय राऊत यांचे भाजपला आव्हान -
संजय राऊत यांनी महाराष्ट्र भाजपकडून दोन अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. त्यातील पहिली म्हणजे, बेळगावातील विजयी मराठी उमेदवारांना मुंबईतील हुतात्मा स्मारकासमोर डोके टेकून महाराष्ट्र अस्मितेची शपथ घ्यायला लावा, आणि दुसरी म्हणजे, बेळगाव पालिकेत महाराष्ट्रात विलीन होण्याबाबतचा दोन ओळींचा ठराव मंजूर करा... आहे मंजूर? अहंकार बाजुला ठेवून हे एवढे कराच, असे आव्हानच ट्विटद्वारे संजय राऊत यांनी महाराष्ट्र भाजपला दिले आहे.
- काय म्हणाले होते फडणवीस?
बेळगावात खासदार संजय राऊत यांच्या अहंकाराचा पराभव झाला आहे. मराठी माणसाचा पराभव कुणीही करु शकत नाही. भाजपच्या नगरसेवकांमध्ये 15 पेक्षा अधिक मराठी नगरसेवक आहेत. एखाद्या पक्षाचा पराभव झाला म्हणून मराठी माणसाचा पराभव होत नाही, असे फडणवीस म्हणाले होते.
हेही वाचा - बेळगावमध्ये मराठी माणसाचा विजय तर संजय राऊत यांच्या अहंकाराचा पराभव - फडणवीस