मुंबई - गिरणी कामगार संघर्ष समितीचे नेते दत्ता इस्वलकर यांचे प्रदीर्घ आजाराने काल (बुधवार) निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने सर्वस्तरातून दुःख व्यक्त करण्यात आले. संजय राऊत यांनीही दत्ता इस्वलकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
गिरणी कामगारांच्या हक्कासाठी लढा देणारे नेतृत्व कामगार नेते दत्ता इस्वलकर यांनी गिरणी कामगारांसाठी मोठा लढा दिला होता. कामगारांचे प्रश्न सातत्याने लावून धरले होते. गिरणी कामगारांना हक्काची घरे देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, ४ मुले आणि नातवंडे असा परिवार आहे. गिरणी कामगारांचा संप असो की, गिरणी कामगारांना हक्काची घरे मिळावी यासाठी लढा देण्यासाठी दत्ता इस्वलकर हे नेहमी पुढे असायचे. त्यांच्या जाण्याने विस्थापित झालेल्या गिरणी कामगारांचा हक्काचा माणूस हरपल्याची भावना गिरणी कामगारांमध्ये पसरली आहे.
काय म्हणाले संजय राऊत…
गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर यांचे जाणे सगळ्यांना चटका लावणारे आहे. श्रमिक कष्टकरी मुंबईतल्या गिरणी कामगारांसाठी त्यांनी आपले आयुष्य झिजवले. गिरणी कामगारांच्या संपानंतर गिरणी कामगारांना ज्या हाल-अपेष्टा भोगाव्या लागल्या, अनेकांचे कुटुंब देशोधडीला लागणार अशात तरुण कार्यकर्ता कामगारांच्या हक्कासाठी उभा राहिला. त्यावेळेस दत्ता इस्वलकर म्हणजे एक बुलंद आवाज बनले. कामगार नेते खूप आहेत पण आम्ही सगळे दत्ता इस्वलकर यांच्या आवाजाला गिरणी कामगारांचा आवाज मानू लागलो. गिरणी कामगारांसाठी हक्काची घरे मिळावी, मालकांनी गिरणीच्या जमिनी लाटल्या आणि कामगारांची देणी थकवली असे अनेक प्रश्न घेऊन दत्ता इस्वलकर हे आयुष्यभर झगडत राहिले. मंत्रालय कामगार न्यायालय या प्रत्येक ठिकाणी दत्ता इस्वलकर याच मुद्द्यांना घेऊन आम्हाला भेटत होते. असा बुलंद आवाज आज आपल्यातून निघून गेला, या शब्दात राऊत यांनी ईश्वरकरांना श्रद्धांजली वाहिली आहे.