मुंबई - राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. सकाळी ६ वाजता ईडीचे चार अधिकारी नवाब मलिक यांच्या घरी पोहोचल्याची माहिती आहे. तेव्हापासून त्यांची चौकशी सुरू आहेत. काही दिवसापूर्वीच ईडीने नवाब मालिकांना समन्स बजावला असल्याची माहिती आहे. हे समन्स कोणत्या प्रकरणात बजावण्यात आले होते, याबाबत अद्यापही अस्पष्टता आहे. नवाब मलिकांच्या चौकशी प्रकरणी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले राऊत ?
"नवाब मलिक हे सत्याच्या बाजूने आहेत, ते नेहमीच सत्य बोलत आले आहेत, ते भाजप विरोधात आवाज उठवत आहेत म्हणूनच मलिकांवर ईडीने कारवाई केली आहे. मात्र, कितीही झालं तरी आम्ही मागे हटणार नाही. ही लढाई अशीच सुरू राहील. परंतु तपास यंत्रणांनी 2024 नंतर येणाऱ्या परिणामांना सामोरे जाण्यास तयार राहावे." असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे.
ईडी फक्त महाविकासआघाडी विरोधातच कारवाई का करते ?
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, "हे आणखी फक्त 2024 पर्यंत चालेल मग ते आहेत आणि आम्ही आहोत. याआधी महात्मा किरीट सोमय्या यांनी सध्या जी लोक भाजपमध्ये आहेत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्यांचं पुढे काय झालं ? हे ईडी ने सांगावं. ही फक्त महाविकासआघाडीच्या नेत्यांच्या विरोधात कारवाई का करते ?" असा सवाल देखील राऊत यांनी उपस्थित केला आहे.