मुंबई - केंद्र सरकार वेगवेगळ्या तपास यंत्रणांना हाताला धरून महाराष्ट्राला बदनाम करत आहेत. खोटीनाटी प्रकरण निर्माण करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा डाव आखला जात आहे. असे करणे म्हणजे राज्याच्या स्वायत्तेवरच घाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारच बरखास्त केले पाहिजे, असे वक्तव्य शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
केंद्रीय तपास यंत्रणाचे कार्यालय मुंबई उघडा -
केंद्रीय तपास यंत्रणा राज्याच्या कारभारात ढवळाढवळ करत आहेत. असे करून त्यांना राज्याला बदनाम करायचे आहे. मात्र केंद्राने कितीही काही केले, तरी राज्यातील महाविकास आघाडी सरकार आपला कार्यकाळ पुर्ण करेल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. वेगवेगळ्या प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणांना जी कारवाई करायची आहे, ती करावी. जी चौकशी करायची आहे, तीही करावी. देशात आणि दिल्लीत करण्यासारखे काही नसल्यामुळे या तपास यंत्रणांनी वाटल्यास एक कार्यालयच मुंबईत उघडावे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
महाविकास आघाडीत मतभेद नाहीत -
महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाही. सरकारची प्रतिमा चांगली रहावी, यासाठी सर्वच जण प्रयत्न करत आहेत. शिवाय अनिल देशमुखांचा राजिनामा घ्याचा की नाही, याचा निर्णय मुख्यमंत्री घेतली. मात्र विरोधकांकडून जो भ्रम निर्माण केला जात आहे. तो निंदनिय असल्याचेही ते म्हणाले. मात्र जे काही आरोप झाले आहेत. त्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निष्पक्ष चौकशी करतील, असेही ते म्हणाले.
परमबीर हे विरोधकांचे महत्वाचे हत्यार -
परमबीर सिंग हे सध्या विरोधकांचे महत्वाचे हत्यार आहे. याच परमबीर सिंग यांच्यावर विरोधकांचा अजिबात विश्वास नव्हता. तेच आता त्यांच्या गळ्यातले ताईत झाले आहेत. विरोधक त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी मारण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान परमबीर यांनी लिहीलेल्या पत्राची चौकशी झाली पाहिजे, असेही ते म्हणाले. शिवाय त्यांनी लिहिलेले पत्र म्हणजे पुरावा नाही, असेही ते म्हणाले. त्याच बरोबर सरकारवर आरोप झाले, म्हणजे लगेचच सरकारच्या प्रतिमेला तडा जातो असे नाही, असे स्पष्टीकरणही राऊत यांनी दिले.
विरोधकांनी झोपेतून जागे व्हावे -
विरोधक महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे स्वप्न पहात आहेत. मात्र, त्यांनी कितीही आदळआपट केली. तरी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला काही होणार नाही, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. कितीही दबाव आणि कितीही चौकशा लावा, त्याचा काही एक परिणाम राज्य सरकारवर होणार नाही. महाराष्ट्रात तुमचे डावपेच यशस्वी होणार नाहीत, असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला.
हेही वाचा - शोपियामध्ये चकमक : सुरक्षा रक्षकांनी चार दहशतवाद्यांना घातले कंठस्नान, इंटरनेट सेवा बंद