मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत यांना आज जामीन मिळणार की कोठडी ? याचा आज फैसला होणार आहे. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या अटकेत असलेल्या संजय राऊत यांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. ईडी आज पुन्हा एकदा संजय राऊत यांची कोठडी वाढवून मिळावी, यासाठी मागणी करणार आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना 1ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती.
संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता, त्यांना 4 ऑगस्टपर्यंत कस्टडी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांची कस्टडी पुन्हा 8 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आले होते. आज पुन्हा राऊत यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असून त्यांची पुन्हा कस्टडी देण्याची शक्यता आहे.
संजय राऊत यांचे आज ईडीने 24 तासानंतर करण्यात येणारे नियमित वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. आज मुंबई सत्र न्यायालयामध्ये संजय राऊत यांना दुपारी 12 वाजेपर्यंत कोर्टासमोर हजर करण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या चौकशी दरम्यान ईडीला मिळालेल्या माहितीनुसार आणि इतर काही लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार उद्या ईडी पुन्हा संजय राऊत यांची कस्टडी मागणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
प्रवीण राऊत हे राऊतांना दर महिन्याला 2 लाख देत - पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणात अटकेत असलेले संजय राऊत यांची ईडी कोठडी 4 ऑगस्ट रोजी संपत आहे. ईडीने राऊतांना 31 जुलैला रात्री उशिरा भांडुपच्या घरातून ताब्यात घेऊन अटक केली होती. या प्रकरणी ईडीने असा दावा केला होता, की संजय राऊत यांचा संबंध असून प्रवीण राऊत यांच्या माध्यमातून संजय राऊत यांनी पैसा मिळवला. प्रवीण राऊत फक्त मोहरा होते, खरे सूत्रधार संजय राऊत हेच होते. आमच्याकडे याचे पुरावे आहेत. तसेच राऊतांनी दोन साक्षीदारांना धमकावल्याचे ईडीच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले आहे. संजय राऊत यांना जर जामीन मिळाला, तर ते पुन्हा धमकाविण्याचं किंवा त्यापुढे जाऊन कृत्य करु शकतात. तसेच राऊत यांचे परदेश दौरे बिझनेसमन आणि विविध लोकांकडून पुरस्कृत केले जातात, याचं नेमकं कारण काय ? असा सवाल करत प्रवीण राऊत हे संजय राऊतांना दर महिन्याला 2 लाख देत होते ते कशासाठी ? असा सवालही ईडीने उपस्थित केला आहे.
संजय राऊत यांच्यावर ईडीने कोणते आरोप केले ? - संजय राऊत यांचा पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप ईडीने केला. त्यांचे भाऊ प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. त्यांना HDIL ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले. अलिबाग येथे याच पैशातून जमीन खरेदी करण्यात आली. राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे. या प्रकरणात ज्यांचे नाव सुरुवातीला समोर आले होते. आणि ज्यांच्यावर कारवाई झाली होती, ते प्रविण राऊत हे नावालाच होते. या प्रकरणातील खरे आरोपी संजय राऊत असल्याचा दावा ईडीने केला आहे. संजय राऊत हेच प्रविण राऊत यांना समोर करून सर्व व्यवहार करत होते, असे ईडीने न्यायालयात सांगितले. मग पत्राचाळ गैरव्यवहारातील पैसे असो की दादर येथील घर आणि अलिबाग येथील जमीन सर्व व्यवहार संजय राऊत यांच्या सांगण्यावरूनच करण्यात आले आहेत. येस बँक घोटाळा प्रकरणी वाधवान बंधू यांच्यासोबत प्रविण राऊत यांचं नाव आलं असून या प्रकरणीही संजय राऊत यांची भविष्यात ईडीकडून चौकशी केली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काय आहे पत्राचाळ घोटाळा ? - मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा म्हाडा भूखंड आहे. पत्राचाळ जमीन घोटाळा 1034 कोटी रुपयांचा आहे. पत्राचाळमध्ये राहणाऱ्या 672 भाडेकरूंना सदनिका देण्याची योजना सरकारने आखली. तेव्हा हा घोटाळा सुरू झाला. ही चाळ विकसित करण्याचे कत्रांट महाराष्ट्र गृहनिर्माण व विकास प्राधिकरणाने प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन या कंपनीला दिले होते. गुरु आशिष कंपनी चाळीतील भाडेकरूंना 672 सदनिका देऊन 3 हजार फ्लॅट एमएचडीएला देणार होती. हे फ्लॅट 47 एकर जागेवर बांधले जाणार होते. मात्र, गुरु आशिष कन्स्ट्रक्शनने तसे केले नाही. कंपनीने चाळीतील लोकांसाठी फ्लॅट बांधले नाहीत किंवा एमएचडीएला फ्लॅटही दिला नाही. कंपनीने ही जमीन अन्य 8 बिल्डरांना 1034 कोटी रुपयांना विकली. हे दोन्ही घोटाळे करणाऱ्या एचडीआयएलचे संचालक प्रवीण राऊत, सारंग वाधवान, राकेश वाधवन आहेत.
ईडीने प्रवीणला पकडले, तेव्हा संजय राऊतचे नाव समोर आले. प्रवीण हा शिवसेना खासदार संजय राऊत यांचा मित्र आहे. प्रवीणच्या पत्नीने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना 83 लाखांचे कर्जही दिले होते. ज्याचा वापर राऊत कुटुंबाने दादरमध्ये फ्लॅट घेण्यासाठी केला होता. तपास सुरू झाल्यावर वर्षा यांनी प्रवीणच्या पत्नीला 55 लाख रुपये परत केले. या प्रकरणातील आणखी एक आरोपी सुजित पाटकर याचाही संजय राऊतशी संबंध आहे. सुजित हा संजय यांच्या मुलीच्या फर्ममध्ये भागीदार आहे. सुजितची पत्नी आणि संजय राऊत यांच्या पत्नीने मिळून अलिबागमध्ये जमीन खरेदी केली होती. ही जमीनही घोटाळ्याच्या पैशातून घेण्यात आली होती.
हेही वाचा - Nilesh Rane : दीपक केसरकरांनी आपल्या औकातीत रहावं, अन्यथा...; निलेश राणेंचा थेट इशारा
हेही वाचा - मोहरम! नेमकं काय झालं होतं आशुरच्या दिवशी; पाहा व्हिडिओ