मुंबई : अन्वय नाईक यांच्या हत्येप्रकरणी अर्णब गोस्वामी यांना बुधवारी अटक करण्यात आली. त्यानंतर भाजाप नेत्यांनी यावर मोठ्या प्रमाणात आक्षेप घेतला. भाजप नेत्यांनी विरोध करावा, त्यांना तो अधिकार आहे. मात्र त्यापूर्वी त्यांनी अन्वय नाईक यांच्या विधवा पत्नी आणि मुलीची भेट घेऊन त्यांचे दुःख जाणून घ्यावे. त्यांचे निवेदन ऐकूनही भाजप नेत्यांना पाझर फुटला नाही, तर त्यांनी यापुढे देशात मानवता, न्याय आणि सत्य या शब्दांचा वापर करु नये, असे शिवसेना नेते संजय राऊत आज म्हणाले.
रिपब्लिक टीव्ही हा भाजपचा लाऊडस्पीकर..
शिवसेना नेते संजय राऊत यांनी अर्णब गोस्वामीवरुन भाजपवर टीका केली आहे. अर्णब गोस्वामी भाजपचे कार्यकर्ते आहेत. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी अमित शाह आणि इतर भाजप नेते विरोधात उतरले असतील. मात्र, अर्णबला पत्रकार म्हणून नव्हे, तर त्याने केलेल्या फसवणुकीसाठी अटक करण्यात आली आहे हे भाजपच्या नेत्यांनी लक्षात घ्यावे, असे राऊत म्हणाले. सामना जसे शिवसेनेचे मुखपत्र आहे, त्याप्रमाणेच रिपब्लिक टीव्ही हा भाजपचा लाऊडस्पीकर आहे, असे राऊत म्हणाले.
..तर सर्वांची पळताभुई थोडी होईल
अर्णबला न्यायालयीन कोठडी मिळाली याबाबत मुख्यमंत्र्यांचा काही संबंध नाही. उलट, त्याबाबत दिल्लीमधून पडद्यामागे ज्या काही हालचाली सुरू आहेत त्या जर मी सांगितल्या, तर सर्वांची पळताभुई थोडी होईल, असे राऊत म्हणाले.
रिया चक्रवर्तीच्या बाबतीत वेगळी भूमिका..
रिया चक्रवर्तीच्या बाबतीत भाजप नेत्यांची वेगळी भूमिका असते. सुशांत सिंहने आत्महत्या करण्यापूर्वी कोणतीही चिठ्ठी लिहिली नव्हती. मात्र तरीही रियाच्या बाबतीतील केंद्राची भूमीका आपण पाहिली. त्यानंतर आता अन्वय यांच्या पत्नी आणि मुलीच्या बाबतीत मात्र केंद्र वेगळी भूमिका घेत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे, असे राऊत म्हणाले.
महाराष्ट्र पोलीस कळसुत्री बाहुल्या नाहीत..
मुंबई पोलीस हे कोणाच्याही सांगण्यावरुन काहीही करत नाहीत. ते कळसुत्री बाहुल्या नाहीत. त्यांनी काल केलेल्या कारवाईचा कोणताही राजकीय संबंध जोडू नये, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
विरोधक स्वतःचेच वस्त्रहरण करत आहेत..
देशभरातील पत्रकार स्वतः हा पत्रकारितेवर हल्ला नसल्याचे म्हणत आहेत. त्यामुळे याप्रकरणी विरोध करुन भाजप नेते स्वतःचेच वस्त्रहरण करुन घेत आहेत, असा टोला राऊत यांनी लगावला आहे.