मुंबई - उत्तर पश्चिम मतदारसंघाची उमेदवारी देताना मला मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून मला हटवण्यात आलं, ही सत्यता आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद हे कायमस्वरूपी नाही. ४ वर्ष मुंबई काँग्रेसच्या नेत्यांसोबत चांगले नेतृत्व म्हणून काम केले असे म्हणत, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी नवनिर्वाचित मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांना शुभेच्छा दिल्या.
गेले २५ ते ३० वर्षांपासून या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात काम करत आहे . गेल्या काही वर्षांपासून या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून माझी इच्छा होती, ते स्वप्न आज पूर्ण होताना दिसत आहे. या क्षेत्रातील सर्व काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते, माझ्यासोबत काम करतील अशी आशा आहे. या क्षेत्रामधून अधिकाधिक मताधिक्याने लोकसभेत निवडून जाईल असा विश्वास उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांनी व्यक्त केला.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली त्याबद्दल निरुपम यांनी आभार व्यक्त केले. २९ एप्रिलपर्यँत या मतदारसंघात वातावरण निर्मिती केली जाईल. उत्तर पश्चिम मुंबईतील रस्ते, ड्रेनेज व्यवस्था आदी प्रश्नांना प्राधान्य देण्यात येणार आहे. आरेतील हरित पट्टा वाचवण्यासाठी सेव आरे या संघटनेसोबत माझी लढाई सुरूच राहणार असल्याचे ते म्हणाले.
जुहू परिसरात व मुंबईत इतर ठिकाणी भूमिगत मेट्रो सुरू करणाऱ्याचा माझा मानस आहे. नवीन मतदारांसोबत संपर्क वाढवणार आहे. नवीन मतदारांमध्ये मोदी सरकार विरोधात नाराजी आहे. उत्तर पश्चिम लोकसभा निवडणूक लढवण्याचा व मुंबई अध्यक्षपद सोडण्याचा हा निर्णय माझ्यासाठी हितकारक आहे, असे निरुपम यांनी सांगितले.