मुंबई - विधान परिषदचे माजी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे हे परळी विधानसभा मतदार संघातून विजयी झाल्यामुळे विधानपरिषदेत त्यांची जागा रिक्त झाली होती. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दौंड यांची शुक्रवारी बिनविरोध निवड झाली. दौंड यांच्या बिनविरोध निवडीमुळे भाजपला मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे. विधान परिषदेमध्ये भाजपकडून केली यांना आणण्यासाठी पुर्ण ताकत लावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. परंतु, संख्याबळ नसल्याने भाजप ऐनवेळी तोंडघशी पडल्याचे बोलले जात आहे.
या जागेसाठी भाजप कडून राजन तेली यांनी उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, आज अर्ज मागे घ्यायच्या शेवटच्या दिवशी तेली यांनी आपल्याकडे संख्याबळ नसल्याने आपला अर्ज मागे घेतला. तेली रिंगणात उतरल्याने भाजपा आणि महाविकास आघाडी अशी लढत होईल, असे मानले जात होते. मात्र, महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांच्याकडील संख्याबळ 170 असल्याने 105 आमदार असलेल्या भाजपने माघार घेतली.
हेही वाचा - 'हे सरकार सूड उगवणारे नाही'; मुख्यमंत्री ठाकरेंचा भाजपला टोला
संजय दौड म्हणाले, आपण काँग्रेसमधून अलीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस श्रेष्ठींशी चर्चा करूनच हा निर्णय घेतला आहे. गेली अनेक वर्षे काँग्रेसचे इमाने इतबारे काम केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी दिलेला शब्द पाळला. मुंडे कुटुंबीयांशी अनेक वर्ष संघर्ष केला. मात्र, पवारांच्या सांगण्यावरून धनंजय मुंडेंना आपण विधानसभा निवडणुकीत मदत केली होती. विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले, राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निवडणुकीत घोडेबाजार टाळण्याची विनंती विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविस यांना केली होती. त्यानुसार तेली यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असल्याचा दावा दरेकर यांनी केला.
हेही वाचा - ९७ वर्षांच्या आजी लढवणार सरपंचपदासाठी निवडणूक..!