मुंबई - मासिक पाळीदरम्यान सॅनिटरी नॅपकीनचा वापर वाढावा यासाठी प्रयत्न होत असले, तरी अजूनही या प्रयत्नांना म्हणावे तसे यश येताना दिसत नाही. त्यामुळेच आजही राज्यात सॅनिटरी नॅपकीन वापरणाऱ्या महिलांचे प्रमाण केवळ 20 टक्के असून 80 टक्के महिला आजही कापड वापरतात. त्यातच गेल्या एक-दीड वर्षात सॅनिटरी नॅपकीन वापरणाऱ्याचे प्रमाण अस्मिता योजनेमुळे वाढून ते 25 टक्क्यांच्या पुढे गेले होते होते. पण गेल्या सात-आठ महिन्यापासून या योजनेला ब्रेक लागला आहे. त्यामुळे हे प्रमाण पुन्हा खाली आल्याची माहिती मासिक पाळी स्वच्छता जनजागृतीसाठी काम करणाऱ्या समाज सेविकांनी दिली आहे. त्यामुळे या योजनेला पुन्हा गती देण्याची मागणी ही आजच्या जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनाच्या निमित्ताने उचलून धरली आहे.
मासिक पाळीच्या त्या दिवसात मुली-महिलांनी विशेष काळजी घेणे आणि स्वच्छता राखणे गरजेचे आहे. पण आजही भारतात, महाराष्ट्रात याबाबत जनजागृतीच नाही. त्यात ग्रामीण भागात सॅनिटरी नॅपकीनची उपलब्धता नाही. ते परवडत नाही किंवा त्याबाबतचे गैरसमज यामुळे नॅपकीनचा वापर होत नाही. ग्रामीण भागात कपडाच वापरला जातो. मासिक पाळीत स्वच्छता राखली जात नाही. त्यातच ग्रामीण भागात शाळेतील मुली मासिक पाळीदरम्यान शाळेतच जात नाहीत. शाळा दूर असल्यास 8-9 वी पासून शाळा सोडून देतात, अशी परिस्थिती आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी 2018 मध्ये अस्मिता योजना महिला आणि बाल कल्याण विभागाकडून सुरू करण्यात आली.
या योजनेखाली राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अगदी माफक दरात सॅनिटरी नॅपकीन पुरवण्यास सुरुवात झाली. दर महिन्याला नॅपकीन विद्यार्थ्यांनीना दिले जात होते, अशी माहिती या क्षेत्रात काम करणाऱ्या समाज सेविका छाया काकडे यांनी दिली आहे. या योजनेमुळे एक-दीड वर्षात सॅनिटरी नॅपकीन वापरणाऱ्यांचे प्रमाण वाढत चालले होते. विद्यार्थिनीमुळे त्यांच्या घरातल्या महिलाही जागरूक होत होत्या. पण मागील सात- आठ महिन्यांपासून ही योजना बंद आहे. नॅपकीन मिळत नसल्याने शाळेतील मुलींना पुन्हा कपडा वापरावा लागत आहे, असेही काकडे म्हणाल्या. ही योजना बंद झाल्याने सॅनिटरी नॅपकीन वापरणाऱ्यांचा आकडा 25 टक्क्यांपर्यंत गेला होता. योजनेला गती मिळाली असती तर तो आणखी वाढला असता, असे म्हणत ही योजना बंद झाल्याबद्दल काकडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून ही योजना पूर्णपणे बंद आहे, असा आरोप होत आहे. त्यामुळे महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी संपर्क साधला, पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान आजच्या मासिक पाळी स्वच्छता दिनाच्या दिवशी स्त्री रोग तज्ज्ञांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
कोरोनाची भीती, वाढता स्ट्रेस, शारीरिक हालचाल कमी यामुळे महिलांच्या हार्मोन्समध्ये बदल होत आहेत. पाळी पुढे जात आहे, तर पाळी लवकर येत आहे. कधी मोठा रक्तस्त्राव होत आहे. यामुळे घाबरून डॉक्टरांकडे येणाऱ्यांची संख्या वाढल्याची माहिती नायर रुग्णालयातील स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. नीरज महाजन यांनी दिली आहे. तर यात घाबरण्यासारखे काहीही नसून यासाठी डॉक्टरांकडे धाव घेण्याची गरज नाही. फक्त विवाहित स्त्रियांनी प्रेग्नेंसी टेस्ट घरच्या घरी करून घ्यावी. बाकी यामुळे घाबरू नये, असा पुनरुच्चार करत योग्य आहार घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.