मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनची अध्यक्षपदाची निवडणूक (MCA President Election) यंदा प्रतिष्ठेची होणार आहे. निवडणूकीत माजी कसोटीपटू संदीप पाटील (Sandeep Patil) विरुद्ध अमोल काळे (Amol Kale) असा सामना रंगण्याची शक्यता आहे. आधी शर्यतीत असलेले भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) आता अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बाहेर पडले आहेत.
आशिष शेलार बीसीसीआय मध्ये: मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडीनंतर अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणारे आशिष शेलार यांनी आता बीसीसीआयच्या खजिनदार पदासाठी अर्ज सादर केला आहे. परिणामी मुंबई क्रिकेट ग्रुपचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा मार्ग आता मोकळा असल्याचे दिसते आहे. परंतु असे असले तरी नव्याने स्थापन झालेल्या पवार - शेलार गटाकडून अमोल काळे यांनीही अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे अमोल काळे विरुद्ध संदीप पाटील असा सामना अध्यक्ष पदासाठी होऊ शकतो.
संदीप पाटील की अमोल काळे? : मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत राहिली आहे. यंदाही राजकीय समीकरण बदलल्याने ही निवडणूक चर्चेत आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि भाजप नेते आशिष शेलार याच्या गटांनी युती केल्याने या अगोदर शरद पवार गटाकडून अध्यक्षपदाची निवडणूक लढवणारे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांना मोठा धक्का बसला होता. परंतु त्यांनी, मी कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार असं जाहीर केले व आपल्या गटाचे नाव बदलून मुंबई क्रिकेट ग्रुप असे ठेवले. या नाट्यमय घडामोडीनंतर मुंबई क्रिकेट संघटनेत होणाऱ्या राजकीय नेत्यांचा हस्तक्षेपावर क्रिकेट प्रेमी व क्रीडापटूही नाराज असल्याच्या चर्चा आहेत. आता पवार-शेलार गट संदीप पाटील यांना पाठिंबा देतात की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे निकटवर्तीय व चार्टर्ड अकाउंटंट अमोल काळे यांना समर्थन देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
रॉजर बिन्नी बीसीसीआयचे नवे अध्यक्ष: कपिल देव यांच्या विश्व विजेत्या संघातील अष्टपैलू खेळाडू रॉजर बिन्नी भारतीय क्रिकेट मंडळाचे (बीसीसीआय) नवे अध्यक्ष होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. त्यांनी या पदासाठी अर्ज दाखल केला असून ते १८ तारखेला होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेपासून नवीन कार्यकारणी कार्यभार सांभाळतील. विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली पुन्हा अध्यक्ष होण्यास तयार नसल्याने नव्या अध्यक्षांचा शोध काही दिवसांपासून सुरू होता.