मुंबई - हा महाराष्ट्र आहे, तरीही वर आमचे सरकार आहे, महाराष्ट्र केंद्राशी काय संघर्ष करणार? अशी मस्तवाल व महाराष्ट्रविरोधी भाषा राणे वापरतात. महाराष्ट्राच्या अस्मितेची इतकी नाचक्की महाराष्ट्राच्या दुष्मनांनी कधी केली नव्हती. राणे हे 'नॉर्मल' मनुष्य नसल्यानेच त्यांनी महाराष्ट्राला कमी लेखले. भाजपने आता तरी शहाणे व्हावे, असा सल्ला सामन्यातून देण्यात आला आहे.
हेही वाचा - नाशकात भाजपाकडून मुख्यमंत्र्यांविरोधात पोलिसांत तक्रार
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांना अटक झाली होती. अटकेपूर्व जामीन मिळाल्यावर काल राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात शिवसेनेवर शरसंधान साधत, तुम्ही कुणीही माझे काहीही करू शकत नाही. तुम्हा सर्वांना मी पुरून उरलो आहे, असे राणे यांनी ठणकावून सांगितले होते. त्यानंतर राणेंवर आज सामन्यातून उपरोक्त खोचक टीका करण्यात आली.
कुणावरही कसेही बकायचे हा सध्या राजकारण्यांचा धंदा
घरात व दारात भरपूर गांजाची शेती पिकवायची व त्याच गांजाचे सेवन करून कुणावरही कसेही बकायचे, हा सध्या अनेक राजकारण्यांचा धंदा झाला आहे. ही गांजाची शेती कायद्यानेच बंद केली पाहिजे व त्याची सुरुवात केल्याबद्दल महाराष्ट्राची जनता ठाकरे सरकारला धन्यवाद देत असल्याचेही सामन्यात सांगण्यात आले.
कायदा सगळ्यांसाठी सारखाच
माणूस 'नॉर्मल' असो किंवा राणेंसारखा 'अॅबनॉर्मल', कायदा सगळ्यांसाठी सारखाच आहे, हे राज्याच्या पोलिसांनी दाखवून दिले आहे. असे गुन्हे इकडे तिकडे घडतच असतात, कोणीतरी धमक्या देतो, जिवे मारू असे बोलतो, त्यावर फिर्यादी व्यक्ती इंडियन पिनल कोडप्रमाणे गुन्हा दाखल करते, पोलीस आपले काम करते, राणेंच्या बाबतीत वेगळे काहीच झाले नाही, असे सामन्यातून सांगण्यात आले. त्याचबरोबर, राणेवरील कारवाई योग्य नाही, असा सवाल फडणवीस कोणत्या आधारावर करत आहे? राणेंना पकडल्यानंतर राज्यात अफगाणिस्तानमधील तालिबानी राजवट असल्याचे म्हणणे हा राज्याचा अपमान आहे. फडणवीस यांना राणे हे काय खान अब्दुल गफार खान वाटले काय? कायद्याने चाललेले राज्य मोडण्यासाठी त्यांचे हे प्रयत्न असून राणेंच्या अटकेनंतर भाजपला मिरच्या झोबण्याचे कारण नव्हते, अशी टीकाही करण्यात आली.
राणे यांनी स्वत:ला महान समजणे बंद करावे
राणे यांनी स्वत:ला महान समजले तर त्यांच्या आयुष्यातील बऱ्याच समस्या औषधांशिवाय बऱ्या होतील व त्यांचा संसर्ग होण्यापासून भाजपही वाचेल, असा सल्ला देखील राणे यांना सामन्यातून देण्यात आला आहे.
हेही वाचा - कृषीतज्ञ, पद्मश्री बी. व्ही. निंबकर यांचे निधन