मुंबई - एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या बहीण यास्मिन वानखेडे यांनी राज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. आंबोली पोलिसांनी यास्मिन यांचा जबाब नोंदवला असून दोन दिवसांत तक्रार दाखल करण्याचे आश्वासन दिले आहे.
जर पोलिसांनी 2 दिवसांत तक्रार नोंदवली नाही तर, आपण स्वतः एक वकील असून न्यायालयामार्फत केस दाखल करू, असे यास्मिन यांनी सांगितले.
हेही वाचा - Bonus : वीज कंपन्यांतील नियमित व सहायक कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान जाहीर
समीर वानखेडेंच्या सुरक्षेत वाढ
दरम्यान, समीर वानखेडेंच्या सुरक्षेमध्ये केंद्रीय गृहमंत्रालयाने वाढ केली आहे. त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात येईल. समीर वानखेडे, आपल्या आणि कुटुंबीयांच्या जिवाला धोका असल्याचे समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले होते. त्यानंतर समीर वानखेडेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
वैयक्तिक टीकेवर नवाब मलिक म्हणाले..
समीर वानखेडे यांनी आतापर्यंत केलेल्या कारवाईमध्ये केवळ 2 ते 5 ग्राम ड्रग जप्तीच्या कारवाया केल्या. तसेच, वानखेडे यांनी एका प्रकरणात वर्षभरापूर्वी गुन्हा दाखल केला. त्यात कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामध्ये चित्रपट जगतातील 30 लोकांना चौकशीसाठी बोलावण्यात आले असून एकालाही अटक झाली नाही. त्यामुळे, अशा कारवाया खंडणीसाठी वापर करत असल्याने त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी एनसीबीचे उपमहासंचालक यांना करणार असल्याचे नवाब मलिक यावेळी म्हणाले.
समीर वानखेडेच्या कुटुंबावर वैयक्तिक टीका करत असल्याच्या आरोपावर मलिक म्हणाले की, मी त्यांच्यावर वैयक्तिक आरोप केले नाहीत. ते दलित नसून त्यांनी एका शेड्युल कास्ट मुलाचा अधिकार हिसकावला आहे. त्यांच्या वडिलांनी धर्मांतर करून लग्न केले आहे. जन्माच्या दाखल्यातही दाऊद समीर वानखेडे असा उल्लेख आहे. समीर वानखेडे यांनी एससी, एसटी कमिशनला खोटे आरोप होत असल्याने कारवाईची मागणी केली, पण तो अधिकार ते दलित नसल्याने नाही. त्यांचे सर्टिफिकेट बोगस असल्याने त्यांचीही चौकशी केली पाहिजे. मंत्री नवाब मलिक हे नियोजित बैठकीसाठी गोंदियाला जात असताना नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी एनसीबीच्या कारवायांवर उपरोक्त टीका केली.
हेही वाचा - आर्यन खानने जेलमध्ये खर्च केलेत 'इतके' रुपये