मुंबई - मुंबई महानगरपालिकेची ( BMC Election 2022 ) निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. समजावादी पक्षाने विशेष करून मुंबईमधील शहर विभागाकडे लक्ष दिले आहे. या विभागातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी फोर्ट, कुलाबा ते भायखळा या परिसरातील म्हाडाच्या हजारो जुन्या सेस ( Samajwadi Party Demand Fund For Cess Building ) इमारतीच्या दुरुस्तीसाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी मुख्यमंत्री, महापौर यांच्याकडे केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीदरम्यान आम्हाला बळ मिळाल्यास हा निधी उभारून या विभागातील नागरिकांच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवू, असे समाजवादी पक्षाने म्हटले आहे.
सेस इमारतींचा प्रश्न -
मुंबईमध्ये म्हाडाच्या सुमारे १४ हजार सेस इमारती असून यामधील सर्वाधिक इमारती या इमारती शहर विभागात आहेत. यापैकी बहुतेक इमारती या १०० वर्षाहुन जुन्या आहेत. इमारतींची वेळेवर डागडुजी दुरुस्ती केली नसल्याने या इमारती जर्जर झाल्या आहेत. यामध्ये लाखो नागरिक आपला जीव मुठीत घेऊन राहत आहेत. दरवर्षी पावसाळ्यात या इमारती कोसळून जीवित आणि वित्तहानी होते. इमारत पडल्यावर येथील नागरिकांना तातपुरत्या स्वरूपात जवळपासच्या शाळेत व नंतर प्रदूषण असलेल्या माहुलमध्ये पुनर्वसन केले जाते. सेस इमारतींचा प्रश्न कित्तेक वर्षे रेंगाळलेला आहे. सेस इमारतींचा प्रश्न सोडवण्यासाठी म्हणावे तसे प्रयत्न झलेले नाहीत. यासाठी समाजवादी पक्षाने पुढाकार घेत पालिकेने किंवा राज्य सरकारने ५०० कोटींची तरतूद करण्याची मागणी केली आहे.
५०० कोटी रूपयांची विशेष तरतूद करा -
मुंबई मध्ये अनेक म्हाडाच्या उपकर इमारती (Cess Building) आहेत. परंतु या इमारती जुन्या व जीर्ण झाल्या असल्या तरी देखील अनेक नागरिक आपला जीव धोक्यात घेऊन त्यांचा इमारतीमध्ये राहत आहेत. इमारतींचा पुनर्विकास करण्यासंदर्भात अतिशय उशीर आणि अडचणी निर्माण होत आहेत. त्यांचे मुख्य कारण विकास नियंत्रण नियमन (DCR) मध्ये झालेल्या बदलामुळे विकासकांकडून पुनर्विकास करण्याबाबत विलंब होते आहे. म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतींची अवस्था बिकट असल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून म्हाडाच्या उपकर प्राप्त इमारतींचे डागडूजीकरण होणे गरजेचे आहे. त्यासाठी महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये ५०० कोटी रूपयांची विशेष निधीची तरतूद करण्यात यावी. यामुळे या इमारतींच्या डागडुजी आणि दुरूस्तीसाठी ५०० कोटींचा निधी उभारावा, अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार व मुंबई महानगरपालिकेतील गटनेते रईस शेख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
आम्हाला साथ दिल्यास निधी उभारू -
दक्षिण मुंबईत जुन्या इमारती कधीही पडू शकतात. या इमारती पडल्या की तेथील नागरिकांना माहुलमध्ये पाठवले जाते. याला जबाबदार कोण. म्हाडा कोणी बनवले, म्हाडा बनवल्यावर या इमारती दुरुस्त होऊ नये म्हणून त्यासाठी कोणी फंड दिला नाही, असे प्रश्न शेख यांनी उपस्थित केले आहेत. आमचेच पैसे जमा करून महाडमधील कर्मचाऱ्यांना पगार दिला जातो. एक लाखांचे काम केल्यास केवळ ५० हजारांचे काम केले जाते. यात बदल करण्याची गरज आहे. नगरसेवक म्हणून पालिकेच्या माध्यमातून इमारतीच्या बाजूची कामे होत होती, मात्र इमारतींची डागडुजी आणि पुनर्विकास करता येत नव्हता. ५०० करोडचा निधी उभारून वर्षानुवर्षे जर्जर इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांना न्याय द्यावा. पालिकेच्या निवडणुकीत नागरिकांनी आम्हाला बळ मिळाल्यास हा निधी उभारला जाईल असे रईस शेख यांनी म्हटले आहे.
नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न -
सध्या मुंबई महानगरपालिकेत समाजवादी पक्षाचे ६ नगरसेवक आहेत. यापैकी बहुतेक नगरसेवक शहर विभागातील आहेत. येत्या पालिकेच्या निवणुकीत आपल्या पक्षाचे नगरसेवक जास्तीत जास्त संख्येने निवडून आणण्यासाठी सेस इमारतींवर लक्ष दिले आहे. सेस इमारतींचा प्रश्न उचलून त्याद्वारे त्यात राहणाऱ्या नागरिकांना खुश करून निवडणुकीत आपले उमेदवार जास्तीतजास्त संख्येने निवडून आणण्याचा प्रयत्न समाजवादी पक्षाकडून केला जात आहे.
हेही वाचा - KCR Meet Uddhav Thackeray : मोठी घडामोड.. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर उद्धव ठाकरेंच्या भेटीला दाखल