मुंबई - लॉकडाऊनच्या काळात सलून, पार्लर बंद असल्याने नाभिक समाजाला बेरोजगारीचा आणि उपासमारीचा सामना करावा लागत आहे. व्यायामशाळा देखील बंद असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत आज (गुरुवार) मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली असून, आठवड्याभरात सलून, पार्लर आणि व्यायामशाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याची माहिती मंत्री अस्लम शेख यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली.
लॉकडाऊन संपल्यानंतर राज्य सरकाराच्या मिशन बिगिन अंतर्गत टप्प्याटप्प्याने सुट दिली जात आहे. केशकर्तनालये बंद असल्यामुळे अनेक ठिकाणी, विमान सेवा, एसटी सेवा, दारु विक्रीसाठी जे नियम आहेत, त्याप्रमाणेच नियम पाळून सलून व्यावसायाला परवानगी द्यावी, अशी मागणी सलून व्यावसायिकांनी केली होती. आज मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत सविस्तर चर्चा झाली.
हेही वाचा... पतंजलीच्या 'कोरोनिल'ला महाराष्ट्रात बंदी - गृहमंत्री
एके ठिकाणी नाभिकाने आत्महत्या केल्याची प्रकरण उघडकीस आले होते. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाली असून व्यायाम शाळा आणि केशकर्तनालये यासाठी एसओपी ठरवून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच असून फिजिकल डिस्टन्सिंग, वस्तुंचे सॅनिटायझेशन, सुरक्षितता या गोष्टी निश्चित करून आठवड्याभरात व्यायामशाळा, केशकर्तनालये सुरू होतील, असा विश्वास मंत्री अस्लम शेख यांनी यावेळी व्यक्त केला.
राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी येत्या चार-पाच दिवसात सलून सुरु करण्याबाबत निर्णय होईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार आता सलून सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकार घेत आहे.