मुंबई - सोने खरेदीसाठी आणि पूजनासाठी वर्षातील सर्वात मोठा दिवस म्हणून धनतेरसची ओळख आहे. गेल्या दीड वर्षांपासून ठप्प पडलेल्या सराफा बाजाराला धनतेरसमुळे नवी झळाळी मिळाली आहे. धनतेरसच्या दिवशी आज मुंबईतील जवेरी बाजारमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत अडीचशे कोटी रुपयांहून अधिक सोने खरेदीची उलाढाल झाली होती. रात्री उशिरापर्यंत या आधीचे सर्व रेकॉर्ड ब्रेक करत सातशे कोटींपर्यंतच्या उलाढालीचा अंदाज मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष कुमार जैन यांनी वर्तवला.
हेही वाचा - Diwali 2021 : घरच्या घरी बनवा काजू कतली
सातशे कोटींपर्यंत सोने खरेदी
दरवर्षी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली जाते. साधारणत: २०० ते २५० कोटी रुपयांची उलाढाल करणाऱ्या सराफा बाजारात यावेळी दसऱ्याला सराफा बाजाराने ३०० ते ३५० कोटी रुपयांपर्यंतची उलाढाल अपेक्षित केलेली होती. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून खरेदीसाठी थांबलेल्या ग्राहकांनी तुफान प्रतिसाद नोंदवत दसऱ्याच्या मुहूर्तावर तब्बल ४५० कोटी रुपयांचे सोने लुटले. याआधी सराफा बाजारात दसऱ्याला होणाऱ्या सोने खरेदीहून सुमारे ३० ते ४० टक्के अधिक खरेदी धनत्रयोदशीला नोंदवली जाते. त्यामुळे, दसऱ्याच्या अनुषंगाने धनत्रयोदशीला ७०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. आज मुंबईतील झवेरी बाजारामध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत अडीचशे कोटी रुपयांहून अधिक सोने खरेदीची उलाढाल झाली आहे. संध्याकाळी रात्री उशिरापर्यंत या आधीचे सर्व रेकॉर्ड ब्रेक करत सातशे कोटी रुपयांपर्यंतच्या उलाढालीचा अंदाज मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष कुमार जैन यांनी वर्तवला आहे.
छोट्या दागिन्यांची अधिक खरेदी
या आधी सणासुदीला सोन्याची नाणी, सोनसाखळी अशा छोट्या दागिन्यांना अधिक मागणी होती. मात्र, दसऱ्याला झालेल्या खरेदीत हार, बांगड्या, संपूर्ण सेट, अशा मोठ्या दागिन्यांना अधिक मागणी दिसून आली. विशेष बाब म्हणजे, दिवाळीनंतर लग्नसोहळ्याला सुरुवात होणार असल्याने धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर मोठ्या दागिन्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येत असल्याची माहिती कुमार जैन यांनी दिली.
हेही वाचा - राज्यात कायदा असूनही पत्रकारांवर हल्ले; प्रभावी अंमलबजावणी कधी होणार?