मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनिल देशमुख यांना 'ईडी'ने मनी लाँडरिंग ( Anil Deshmukh Money Laundering Case ) प्रकरणात अटक केली आहे. आता सचिन वाझे यांनी पुन्हा अनिल देशमुख यांच्यासमोर अडचणी उभ्या केल्या आहेत. सचिन वाझे यांनी 'ईडी'ला 4 फेब्रुवारी रोजी दिलेल्या पत्रामध्ये ( Sachin Waze Wrote Letter To ED ) अनिल देशमुख यांच्या विरोधात माफीचा साक्षीदार व्हायला तयार असल्याचे म्हटले आहे.
सचिन वाझेचे पत्र -
मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी अंमलबजावणी संचालनालयाला पत्र लिहून महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील मनी लाँड्रिंग प्रकरणात माफीचा साक्षीदार करण्याची मागणी केली आहे. सक्षम दंडाधिकार्यासमोर वरील प्रकरणाबाबत मला माहित असलेल्या संपूर्ण तथ्यांचा सत्य आणि ऐच्छिक खुलासा करण्यास तयार आहे. भारतीय दंड संहितेच्या 306, 307 नुसार मला माफीचा साक्षी देण्यासाठी हा अर्ज स्वीकारावा, अशी मी विनंती करतो. वाझे यांनी सहाय्यक संचालक अंमलबजावणी संचालनालय यांना 4 फेब्रुवारी रोजी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
काय आहे प्रकरण?
अँटिलिया स्फोटकं प्रकरणात अटकेत असलेला सचिन वाझे हा 'ईडी'च्या मनी लाँड्रिंग प्रकरणातही आरोपी आहेत. इतर आरोपींमध्ये अनिल देशमुख यांचा समावेश आहे. अनिल देशमुख यांना ईडीकडून 2 नोव्हेंबर 2021 रोजी अटक करण्यात आली होती. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. अनिल देशमुख यांची मुले हृषिकेश आणि सलील त्यांचे स्वीय सहाय्यक आणि जवळचे सहकारीदेखील या प्रकरणात आरोपी आहेत. ईडीचा खटला सीबीआयच्या देशमुखांविरुद्धच्या भ्रष्टाचाराच्या एफआयआरवर आधारित आहे. ज्यामध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी आरोप केला आहे. देशमुख यांनी बडतर्फ पोलीस सचिन वाझे आणि इतर दोन अधिकाऱ्यांना बेकायदेशीरपणे बार मालकांकडून दर महिन्याला 100 कोटी वसुली करण्याचे आदेश दिले होते, असे म्हटले आहे.
सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत -
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसेच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत आहे.