मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला सुरुवात होत आहे. या यात्रेदरम्यान राज्यातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली असून त्या रस्त्यावरून प्रवास करताना मुख्यमंत्र्यांनी सावध राहावे. कारण त्यातील खड्ड्यांमुळे आपल्याला स्पोंडीलायसीस होणार नाही याची काळजी घ्यावी, असे उपरोधिक ट्विट काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहे. त्यासोबत या यात्रेत खबरदारी म्हणून या यात्रेच्या रथाबरोबर स्पेअरमध्ये रणगाडा ठेवला तर अधिक बरे! अशीही बोचरी टीका त्यांनी केली आहे.
मागील चार वर्षात राज्य सरकारने केलेल्या विकासकामांची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेची सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सावंत यांनी मंगळवारी हे उपरोधिक असे ट्विट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. सावंत यांनी या ट्विटच्या माध्यमातून राज्यभरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था याकडे सरकारचे लक्ष वेधत ही टीका केली आहे.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात...
"#महाजनादेशयात्रा काढणारे मुख्यमंत्री पाठीचा कणा ताठ ठेवून व मान उंचावून जनतेकडे मतं मागू शकणार नाहीत. दुष्काळातील निष्क्रियता आहेच पण रस्त्यांची दुरावस्था पाहिली तर स्पोंडीलायसीस होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी काळजी घ्यावी. रथाबरोबर स्पेअरमध्ये रणगाडा ठेवला तर अधिक बरे!"