मुंबई - नागरिकांनी मतदान या राष्ट्रीय उत्सवाच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे, अन्यथा येणाऱ्या सरकारला जाब कसा विचारता येईल, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. आपल्या कुटुंबीयांसह त्यांनी आज कांदिवली येथील ठाकूर व्हिलेज येथील ठाकूर तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला.
ठाकूर व्हिलेज येथील मतदान केंद्रावर सकाळपासून मोठी गर्दी होती. सावंत यांनी आपल्या कुटुंबीयांसह तब्बल एक तासाहून अधिक काळ रांगेत थांबून मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्या आईनेही 'ईटीव्हीभारत'शी बोलताना सांगितले की 'मी मतदान केलेले आहे, आता तुम्ही मतदान करा' तर स्वतः सावंत यांनी हा लोकशाहीचा उत्सव असून देशातील नागरिकांनी बाहेर येऊन मोठ्या प्रमाणात मतदान केले पाहिजे, हे मतदान देशाचे भवितव्य ठरवणारे आहे, यामुळे मतदानाचा मूलभूत हक्क बजावावा, असे आवाहन केले.
यावेळी होत असलेल्या मतदानादरम्यान लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून त्याचे चांगले परिणाम निकालाच्या नंतर येतील असा विश्वास सावंत यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच मुंबई आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेल्या मतदानातून मुंबईतील मतदारांनी एक चांगला संदेश दिला असल्याचेही सावंत यांनी सांगितले.