मुंबई - महाराष्ट्रातील भाजपवाल्यांनी अन्वय नाईक यांना न्याय मिळावा, यासाठी वाद घालायला हवा. ते मराठी मातीचे पुत्र आहेत. पण भाजपवाल्यांना सवतीची पोरं मांडीवर खेळवण्यात मौज वाटू लागली आहे. मराठी माणूस मेला तरी चालेल, पण सवतीच्या पोरास सोन्याच्या चमच्याने दूध पाजायचे असे भाजपाचे धोरण स्पष्ट झाले असल्याचा घणाघात शिवसेनेचे मुख्यपत्र सामनात केला आहे. अर्णब गोस्वामींच्या अटकेनंतर भाजपाने केलेल्या आगपाखडीचा सामनाने जोरदार समाचार घेतला.
'त्या' गवताचा काढा भाजपावाले दिवसातून दोन वेळा पितात -
महाराष्ट्रात आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाल्याची आवई भाजपाच्या महाराष्ट्रातील लोकांनी उठवली आहे. त्यांच्या जोडीला दिल्ली सरकारमधील अनुभवी शहाणेही सामील झाले आहेत. कधीकाळी 'काँग्रेस' गवत हे अगदी निरुपयोगी उत्पादन म्हटले जात असे. ते केवळ निरुपयोगीच नव्हे तर चांगलेच उपद्रवी असल्याचे मत तेव्हाच्या राजकीय विरोधकांकडून व्यक्त केले जात होते. आता त्याच गवताचा काढा करून सध्याचे भाजपावाले दिवसातून दोन वेळा पीत असावेत, असे त्यांचे वर्तन असल्याचा टोमणा सामनाने मारला आहे.
तेव्हा आणीबाणीची आठवण का झाली नाही...
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी ही अटक म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला असल्याची प्रतिक्रिया दिली. त्यावर सामनाने देखील प्रत्युत्तर दिले आहे. गुजरातमध्ये सरकारविरोधी लिहिणाऱ्या संपादकांना अटक झाल्या आहेत. उत्तर प्रदेशात पत्रकारांचे मुडदे पाडले गेले. तेव्हा कोणाला आणीबाणीची आठवण का झाली नाही, असा सवाल उपस्थित करण्यात आला.
खासगी प्रकणात अटक -
अर्णब गोस्वामी यांची अटक एका अत्यंत खासगी प्रकरणात झाली आहे. अटकेचा राजकारणाशी, पत्रकारितेशी सबंध नाही. त्यांनी टिळक-आगरकरांप्रमाणे सरकारविरोधात जहाल लिखाण केले. त्यामुळे सरकारने त्यांची गचांडी पकडली असे काही नसल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले.