मुंबई - गेल्यावर्षी एसटी महामंडळाच्या अलिबाग आगारमधील एका एसटी बसमध्ये बॉम्ब सापडलेला होता. त्यानंतर एसटी महामंडळाच्या सुरक्षेवर अनेक प्रश्नचिन्ह उभे झाले होते. काही सुरक्षा व्यवस्था सुधारण्यासाठी एसटी महामंडळाने पुढाकार घेतला. मुंबई सेंट्रल, परळ आणि कुर्ला नेहरूनर आगरमध्ये अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे, मेटल डिटेक्टर डोअर्स बसविण्यात आले होते. मात्र या सर्व सुरक्षेचा बोजवारा उडाला आहे. तसेच परळ बस स्थानकात असलेले मेटल डिटेक्टर बंद आहे. या सर्व सुरक्षेची 'ईटीव्ही भारत'ने पाहणी केली. तर धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सुरक्षेच्या बाबतीत एसटी'कडे नेहमीच दुर्लक्ष-
आज एसटी महामंडळाच्या राज्यभर विस्तार आहे. मात्र सुरक्षेच्या बाबतीत एसटी'कडे नेहमीच दुर्लक्षित राहिलेले आहे. दरवर्षी एसटी महामंडळामध्ये सुरक्षेच्या नावावर कोट्यावधी रुपयाचा खर्च केला जातो. तरीसुद्धा एसटी महामंडळाच्या अनेक बसस्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे, मेटल डिटेक्टर डोअर्स अद्यापही लागलेले नाही. तसेच बसमध्ये अत्याधुनिक जीपीएस यंत्रणा बसवण्याची घोषणा केली होती. ती घोषणा सुध्दा कागदावरच आहे. प्रत्यक्षात उतरलेली नाही.
'मेटल डिटेक्टर डोअर्स' फ्कत शो साठी-
मुंबईतून हजारो एसटी बसेसच्या फेऱ्या होतात. मात्र आजही एसटी महामंडळाचे बस आगार सुरक्षित वाटत नाही. परळ आगारात सुरवातीलाच लावण्यात आलेले 'मेटल डिटेक्टर डोअर्स'वर आत येणाऱ्या प्रवाशांची कोणतीही तपासणी केली जात नाही. काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. या कॅमेराचे मेन स्टेशन डेपो व्यवस्थापकांच्या कॅबिनमध्ये करण्यात आले आहेत. याबाबत आम्ही डेपो व्यवस्थापकांशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र याबाबत मी बोलू शकत नाही, याचे अधिकार वरिष्ठांना आहेत, असे उत्तर त्यांनी दिले. आम्ही वरिष्ठांना देखील संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही.
महाराष्ट्रात 18 हजार 500 बस-
एसटी महामंडळाच्या ताफ्यात सुमारे 18 हजार 500 बसेस आहेत. त्यामध्ये सध्या, लालपरी, शिवशाही, शिवनेरी बसचा समावेश आहे. दररोज 70 लाख प्रवाशांची ने-आण एसटी मार्फत केली जाते. तसेच विशेष म्हणजे एसटी बसेचचे अपघात कमी कसे होतील. यासाठी एसटी महामंडळाकडून एसटी चालकांचे समुपदेश केले जाते. मात्र समुपदेश नको तर गाड्या दुरुस्तीकडे महामंडळाने लक्ष द्यावे, असे एसटीच्या चालकांनी ईटीव्ही भारतशी बोलतांना सांगितले.
एसटी अपघात आकडेवारी-
वर्ष | अपघात |
2013-14 | 3154 |
2014-15 | 3172 |
2015-16 | 2920 |
2016-17 | 2772 |
2017-18 | 2922 |
नोव्हेंबर 18 पर्यंत | 2231 |
70 लाख प्रवाशी करतात प्रवास-
कोरोना येण्याआधी एसटी बसमध्ये 70 लाख प्रवासी दर दिवशी राज्यात प्रवास करत होते. आता ही संख्या 16 लाखावर आली आहे. मात्र एवढी मोठी प्रवासी संख्या असूनसुद्धा प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मात्र मोठी व्यवस्था महामंडळाने उभी केली नाही. विशेष म्हणजे कोरोना काळात बसेसच निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. मात्र ते करताना सुद्धा दिसून येत नाही.
पगार मिळत नसला तरी कर्मचारी मात्र प्रामाणिक-
एसटी बसमध्ये प्रवास करतांना एखाद्या प्रवाशाचा सामान राहिले असता ते सामान जमा करण्याचे काम हे वाहकावर येते. बस पूर्ण खाली झाल्यानंतर बसचा तपास करणे आणि राहिलेले सामान जमा करणे, हे काम प्रामाणिकपणे होत असल्याचे 'ईटीव्ही भारत'च्या पाहणीत दिसून आले आहे.
हेही वाचा- कोरोनाच्या प्रसारामुळे ब्रिटनहून भारतात येणारी विमानसेवा स्थगित
हेही वाचा- केंद्रीय पथकाला जाब विचारण्यासाठी जाणारे शेतकरी पोलिसांच्या ताब्यात