मुंबई - कोरोनाची दुसरी लाट आली असून मुंबई आणि उपनगरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या 22 दिवसात 5 हजार 502 विना मास्क प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल 8 लाख 92 हजार 900 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे.
लोकल प्रवासात विना मास्क प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर पालिका आणि रेल्वे प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे.
हेही वाचा-शरद पवारांची प्रतिष्ठा परत मिळवण्यासाठी अनिल देशमुखांनी राजीनामा द्यावा; रवीशंकर प्रसाद यांचा टोला
8 लाखापेक्षा जास्त दंड वसूल-
पश्चिम रेल्वे मार्गावर 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीपर्यंत 4 हजार 17 विना मास्क प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आलेली होती. या कारवाईतून 6 लाख 29 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला होता. 1 मार्च ते 22 मार्चपर्यंत अर्थात गेल्या 22 दिवसांत 5 हजार 502 प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमधून 8 लाख 92 हजार 900 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे.
हेही वाचा-मुंबईत मंगळवारी 3512 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, 8 जणांचा मृत्यू
200 रुपये दंड-
कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांना पकडण्यासाठी महापालिकेने कर्मचारी तैनात केले आहेत. एकूण क्लिनिक मार्शल आणि पालिका कर्मचारी यांचे 500 पेक्षा जास्त पथक रेल्वे स्थानक परिसरात तैनात आहेत. मात्र, कर्मचारी वर्ग अपुरा पडत असल्याने काही प्रवासी दंड न भरता बिनधास्त प्रवास करत आहेत. तर, काही प्रवासी 200 रुपये दंड भरण्यास टाळाटाळ करत आहेत. त्याचे स्वरुप नंतर भांडण होत आहे.
दुसरी लाट थोपविण्याचा प्रयत्न-
सर्वसामान्य प्रवाशांना 1 फेब्रुवारीपासून मर्यादित वेळेत लोकल प्रवासाची मुभा देतात आली आहे. मात्र, लोकल प्रवासादरम्यान अनेक प्रवासी विना मास्क लोकल प्रवास करत असल्याने त्यांच्यावर पालिका आणि रेल्वेकडून कारवाई करण्यात येत आहे.
मुंबईत आज सर्वाधिक रुग्णांची नोंद
मुंबईत आज 23 मार्चला 3512 रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 69 हजार 426 वर पोहोचला आहे. आज 8 जणांचा मृत्यू झाल्याने, मृतांचा आकडा 11 हजार 600 वर पोहोचला आहे. तर 1203 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 3 लाख 29 हजार 234 वर पोहोचली आहे. मुंबईत सध्या 27 हजार 672 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90 टक्के असून, रुग्ण दुपटीचा कालावधी 90 दिवस इतका आहे.