मुंबई - मुंबई महापालिका (BMC) व सत्ताधारी शिवसेनेचा (Shivsena) कोस्टल रोड (Coastal Road) हा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पावर या आर्थिक वर्षात २ हजार कोटींचा खर्च केला जाणार होता. मात्र हा निधी कमी पडल्याने पालिकेने आपल्या विशेष निधीमधून ५०० रुपये काढून कंत्राटदार व सल्लागाराला दिले जाणार आहेत. यासंदर्भातील माहितीपर प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठीकित मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.
मुंबई शहरातून पश्चिम उपनगरात जाण्यासाठी सुमारे तीन तासांचा कालावधी लागतो. यामुळे नागरिकांचा वेळ वाया जातो. तसेच प्रदूषणात वाढ होते. यावर उपाय म्हणून सत्ताधारी शिवसेना आणि पालिकेने समुद्रात पूल उभारून तसेच बोगदे बांधून कोस्टल रोड प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. २०२३ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार असून त्यासाठी पालिका तब्बल १२ हजार ७२१ कोटी रुपये खर्च करणार आहे. कोस्टल रोडच्या कामासाठी पालिकेने २०२१ - २२ च्या अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या २ हजार कोटी रुपयांमधून आतापर्यंत १ हजार ९९६ कोटी रुपये खर्च केले आहेत. जानेवारी २०२२ पर्यंत या कामासाठी अतिरिक्त ५०० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यामुळे हे ५०० कोटी रुपये 'विशेष निधी'(पायाभूत सुविधा विकास निधी) मधून उपलब्ध करण्यात येणार आहे.
- कसा असेल कोस्टल रोड -
मुंबईतील पश्चिम उपनगरापासून शहर भागापर्यंतच्या रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या मार्गी लावण्यासाठी व इतर उद्देश साध्य करण्यासाठी बहुउद्देशीय १०.५८ किलोमीटर लांबीच्या या 'कोस्टल रोड' प्रकल्पाचे बांधकाम प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे - वरळी सागरी सेतू (सी लिंक) च्या दक्षिण टोकापर्यंत करण्यात येत आहे. सध्या या 'कोस्टल रोड' चे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ५० टक्के काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करायचे आहे. त्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. हे काम निधी अभावी बंद पडू नये यासाठी पालिका अधिक काळजी घेत आहे.
या 'कोस्टल रोड' च्या कामाअंतर्गत पॅकेज १,२ व ४ चे कंत्राटदार, सल्लागार व साधारण सल्लागार यांना त्यांचा कामाचा मोबदला जानेवारी २०२२ पर्यंत देण्यासाठी ५०० कोटींची आवश्यकता होती. त्यामुळेच पालिकेने ५०० कोटी रुपये 'विशेष निधी'(पायाभूत सुविधा विकास निधी) मधून उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष निधी अंतर्गत जमा होणारी रक्कम ही मुंबई शहरातील पायाभूत सुविधांच्या विकास प्रकल्प कामाकरिता वापरायची आहे. त्याअनुषंगाने कोस्टल रोड आणि गोरेगाव - अंधेरी लिंक रोड या कामांसाठी होणारा खर्च हा सदर विषेश निधीमधून करण्यात येत आहे.