मुंबई - राज्यातील प्रमुख विरोधी पक्षातील नेत्यांच्या सुरक्षेमध्ये कपात करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्यामध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांचा समावेश आहे. दरम्यान रामदास आठवले यांच्या सुरक्षेमध्ये कपात करण्यात आल्याने, रिपाईच्या वतीने कांदीवलीच्या समतानगर पोेलीस स्टेशनसमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मातोश्रीबाहेर आंदोलन करण्याचा इशारा
रामदास आठवले यांच्या सुरक्षेमध्ये कपात केल्याने रिपाईचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कार्यकर्त्यांच्या वतीने शुक्रवारी समतानगर पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडी सरकार जातीय राजकारण करत असल्याचा आरोप यावेळी कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. दरम्यान रामदास आठवले यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करावी अन्यथा मातोश्रीबाहेर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे. यावेळी पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात देखील घेतले आहे.