मुंबई - रेल्वे संरक्षण दलाचे आरपीएफ कर्मचारी नेहमीच आघाडीवर असतात आणि रेल्वेच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी 24 तास जागरुक राहतात. याबरोबरच त्यांनी इतर कर्तव्यावर असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीने मुंबईतील शेकडो रेल्वे प्रवाशांचे प्राण वाचवले आहे. मध्य रेल्वेच्या आरपीएफ कर्मचार्यांनी २०२१ मध्ये स्वतःचा जीवही धोक्यात घालून ४७ रेल्वे प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत.
- रेल्वे संरक्षण दल रेल्वे प्रवाशांचे तारणहार
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मिशन जीवन रक्षकचा एक भाग म्हणून मध्य रेल्वेच्या आरपीएफ कर्मचार्यांनी २०२१ मध्ये मुंबई उपनगरीय मार्गावर काही वेळा स्वतःचा जीवही धोक्यात घालून आतापर्यंत ४७ लोकांचे प्राण वाचवले आहेत. यापैकी काही प्रवाशांचा जीव वाचवणाऱ्या थरकाप उडणाऱ्या घटना सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. रेल्वे संरक्षण दलाच्या या जवानांना प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेवरील गुन्हे, अतिरेकी हिंसाचार, ट्रेनच्या वाहतुकीत अडथळा आणण्या-यांचा बंदोबस्त, बेपत्ता मुलांची सुटका करणे आणि रेल्वेगाड्या आणि रेल्वे परिसरात अंमली पदार्थ जप्त करणे, अशा विविध सुरक्षा आव्हानांचा सामना करावा लागतो. या सगळ्यासह ते प्रवाशांच्या सुरक्षेवर बारीक लक्ष ठेवून असतात.
- वर्षभरातील अशी आहे आकडेवारी
२०२१ मध्ये, ११ प्रकरणे कल्याण स्थानकावर, १० प्रकरणे दादर येथे, ६ ठाणे, ४ लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेल येथे ३, कुर्ला आणि वडाळा रोड येथे प्रत्येकी २ तसेच तुर्भे, टिटवाळा, रोहा, कसारा, डोंबिवली, घाटकोपर, भायखळा, दिवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेन लाइन स्थानकांवर प्रत्येकी १ प्रकरणांत, अशा प्रकारे मुंबई उपनगरी/गैर उपनगरीय मार्गावर ४७ रेल्वे प्रवाशांचे प्राण वाचवले आहे.
- प्राण वाचविण्याच्या काही घटना
बहुतेक लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये चढताना किंवा उतरताना प्रवाशांचे प्राण वाचले आहे. अलीकडे २६ डिसेंबर २०२१ रोजी, आरपीएफ कॉन्स्टेबल राजू पुनिया यांनी ठाणे स्टेशनवर कर्तव्य बजावत असताना, आझमगड, उत्तर प्रदेश येथील रहिवासी राम प्रवेश बिहारी यांना धावत्या ट्रेन 11055 डाउन गोदान एक्स्प्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना खाली घसरताना पाहिले. ट्रेनच्या गार्डनेही हे पाहिले आणि त्यांनी तत्काळ प्रेशर सोडून ट्रेन थांबवली. त्यामुळे प्रवाशाचे प्राण वाचले आहे. दुसर्या घटनेत, आरपीएफ कॉन्स्टेबल आरके मीणा यांनी १७ डिसेंबर २०२१ रोजी पनवेल स्थानकावर प्लॅटफॉर्मवर कर्तव्य बजावत असताना पनवेल-गोरखपूर ट्रेन क्र.15066 मध्ये चढण्याच्या प्रयत्नात एक महिला प्रवासी ज्ञान देवी रहिवासी कामोठे, पनवेल या घसरून ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये पडताना दिसल्या. त्यांनी ताबडतोब कृती करून प्रवाशाला सुरक्षित ठिकाणी खेचले आणि तिचा जीव वाचवला.