मुंबई - मुंबईत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी तुंबले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयात आज ज्या सुनावण्या होणार होत्या, त्या उद्यावर ( गुरूवारी ) ढकलण्यात आल्या आहेत.
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणामध्ये रिया चक्रवर्ती हिला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता 6 ऑक्टोबरपर्यंत तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. त्यानंतर रियाकडून उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. यावर आज सुनावणी होणार होती. या बरोबरच अभिनेत्री कंगना रणौतच्या अनधिकृत कार्यालयावर मुंबई महापालिकेने कारवाई केली होती. याविरुद्ध कंगनाने उच्च न्यायालयात याचिका दाखल करत दोन कोटींच्या नुकसानभरपाईची मागणी केली होती. या प्रकरणी आज सुनावणी होणार होती.
यासोबतच, सुशांत सिंह राजपूत प्रकरणी तपास करत असलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो कडून अटक करण्यात आलेले अनुज केस,वानी अंकुश अरनेजा, करमजीत आनंद , संकेत पटेल, संदीप गुप्ता, आफताब अन्सारी व डिवाइन फर्नांडिस या आरोपींची न्यायालयीन कोठडी 23 सप्टेंबर रोजी संपत असल्या कारणामुळे त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पुन्हा एकदा न्यायालयात हजर केले जाणार होते.
मात्र, आज उच्च न्यायालयाचे कामकाज बंद असल्यामुळे या सुनावण्या उद्या होणार आहेत.
दरम्यान, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो कडून हिमाचल प्रदेश येथे एका मोठ्या ड्रग्स पेडलरला अटक करण्यात आली होती. राहील नावाच्या या आरोपीकडून एनसीबीने जवळपास चार कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. या आरोपीचे बॉलीवुड मधल्या मोठ्या व्यक्तींशी अमली पदार्थांच्या संदर्भात संबंध असल्याचं एनसीबीच्या तपासातून समोर आलेला आहे. त्यानुसार नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो हे तपास करीत आहेत.