मुंबई - सांताक्रूझ परिसरातील रिक्षाचालक रमेश साहू यांच्या लायसन्स आणि बॅच बिलाचा गैरवापर करून एका अनोळखी इसमाने २०१७ मध्ये अंधेरी आरटीओ कार्यालयातून रिक्षा परमिट व नविन रिक्षा नोंदणी केली होती. त्या इसमाने रिक्षाचे पैसे न भरल्याने बँकेचे पत्र रमेश साहू यांच्या पत्यावर आल्यानंतर आपले लायसन्स आणि बॅच बिल्ला याचा गैरवापर झाल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी याबाबतची तक्रार अंधेरी आरटीओ कार्यालयात केली. मात्र, त्यांना न्याय मिळण्याऐवजी त्यांची रिक्षा आरटीओने जप्त केली आहे. दोन वर्षे होऊनसुद्धा तक्रारदार रमेश साहू यांची रिक्षा अंधेरी आरटीओ कार्यलयात धूळखात पडली असून, स्पेअरपार्टही गाहाळ केले गेले आहेत.
हेही वाचा - म्हाडाकडून पुढच्या महिन्यात 1200 घरांची निघणार सोडत; ठाणे, डोंबिवली, नवी मुंबईत असणार ही घरे
काय आहे नेमके प्रकरण?
पीडित रमेश साहू यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितले की, माझे लायसन्स क्रमांक MH0220043041821 आणि रिक्षा बॅच क्र. AIR 241722 असा आहे. २०१८ रोजी राहत्या पत्यावर रिक्षा कर्जाचा हप्ता न भरल्याची नोटीस मला आली होती. त्या नोटीसवर माझे संपूर्ण नाव, पत्ता आणि रिक्षाचा नंबर MH-02-EQ-0751 होता. परंतु, माझ्या रिक्षाचा नंबर MH-02-FB-1705 असल्याने बँकेने मला नोटीस का पाठवली याची चौकशी करण्यासाठी नोटीसीवरील पत्याच्या आधारे बँकेत गेलो. बँकेत विचारणा केल्यावर मला समाधानकारक उत्तर न मिळाल्याने अंधेरी आरटीओ कार्यालयात सहाय्यक प्रादेशिक परीवहन अधिकारी हेमंत पाटील यांना भेटून घडलेला प्रकार सांगितला. तेव्हा पाटील यांनी MH-02-EQ-0751 च्या रिक्षा मालकाला नोटीस काढली त्यानंतर पाटील यांची बदली झाली व त्यांच्या जागी सहाय्यक प्रादेशिक परीवहन अधिकारी शामराव शेटे आले. त्यांना सुद्धा घडलेल्या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.
.... दोन्ही रिक्षा जप्त
आरटीओ अधिकाऱ्यांनी तक्रारदार रमेश साहू आणि अनोळखी इसमाचे रिक्षा काळ्या यादीत टाकले. दोघांनाही सर्व कागदपत्रे घेऊन चौकशीला हजर होण्यास सांगितले. त्यानंतर अनोळखी इसम बेपत्ता झाला आहे. काही दिवसानंतर जेव्हा रमेश साहू आपल्या रिक्षाचे पासिंग करायला गेले. तेव्हा रमेश साहू यांचे रिक्षाचे सर्व कागदपत्रे ब्लॅकलिस्ट केले गेले होते. याबाबत पुन्हा एकदा अंधेरी आरटीओ कार्यायलायत तक्रार केली. तेव्हा अंधेरी आरटीओतील अधिकाऱ्याने रमेश साहू आणि अनोळखी इसमाचे रिक्षा जप्त केले. त्यानंतर लॉकडाऊन लागू झाला. तेव्हापासून दररोज तक्रारदार रमेश साहू अंधेरी आरटीओ कार्यालयात आपल्या न्यायासाठी खेटे मारत आहे. मात्र, आज दीड वर्ष झाला त्यांच्या रिक्षा त्यांना परत मिळालेला नाही. याबाबत 'ईटीव्ही भारत'ने अंधेरी आरटीओचे प्रादेशिक परीवहन अधिकारी अशोक पवार यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. चौकशीत जो कोणी दोषी आढळेल त्यांच्यावर आम्ही कठोर कारवाई करणार आहोत.
माझ्यावर कर्जाचे डोंगर -
अनोळखी व्यक्तीशी माझा किवा माझ्या परिवाराशी काहीही संबंध नसताना माझी खोटी सही करून माझ्या राहत्या घराच्या पत्याचा व माझ्या अनुज्ञप्ती व बॅजचा लबाडीने गैर वापर करून आरटीओ कार्यालयाची दिशाभूल व फसवणूक केली. मात्र, त्यांच्यावर कारवाई न करता, माझी रिक्षा अंधेरी आरटीओने जप्त केली आहे. त्यामुळे, गेल्या दोन वर्षांपासून उत्पनाचे माझे साधन बंद झाले. परिणामी, माझ्यावर कर्जाचे डोंगर झाले आहे. माझी रिक्षा अंधेरी आरटीओ कार्यलयात धूळखात पडली असून, स्पेअरपार्टही गाहाळ झाले. माझे झालेले आर्थिक नुकसान भरून देण्यात यावेत, याशिवाय अनोळखी व्यक्तीविरोधात अंधेरी आरटीओ कार्यालयाने कारवाई करावी. जर मला येत्या काही दिवसांत न्याय मिळाला नाही, तर मी आरटीओविरोधात न्यायालयात जाणार असल्याची प्रतिक्रिया तक्रारदार रमेश साहू यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली.
हेही वाचा - नवाब मलिक यांच्या जामीनासाठी 3 कोटी रुपयांची मागणी, मुंबई पोलिसात गुन्हा दाखल