मुंबई- राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील १२ लाख परवानाधारक रिक्षा चालकांना दीड हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यामुळे राज्यातील रिक्षा चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र हे दीड हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी संबंधित रिक्षाचालकांना आपले आधार कार्ड बॅंकेशी संलग्न (लिंक) करावे लागणार आहे. आपले आधार कार्ड बॅंकेला लिक करण्याचे आवाहन रिक्षा चालकांना राज्य परिवहन आयुक्तांकडून करण्यात आले आहे. दरम्यान यासाठी लवकरच एक नवी प्रणाली विकसीत करण्यात येणार असल्याची माहिती देखील यावेळी आयुक्तांनी दिली.
आधार कार्ड बॅंक खात्याला लिंक करणे आवश्यक
परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शासनाने फक्त परवानेधारक रिक्षाचालकांनाच सानुग्रह अनुदान म्हणून १ हजार ५०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे. त्यासाठी रिक्षा चालकांना आपले आधारकार्ड बॅंक खात्याशी लिंक करावे लागणार आहे. या सर्व प्रक्रियेसाठी एक विशेष प्रणाली विकसित करण्यात येत असून, त्याबाबतची सर्व माहिती http://transport.maharashtra.gov.in/1035/Home या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे लाभधारकांनी लवकरात लवकर आपले आधारकार्ड बॅंक खात्याशी लिंक करून घ्यावे, असे आवाहन परिवहन आयुक्तांकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा - कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेल्वेचे 11 कोच सज्ज; नागपूर महापालिकेकडे हस्तांतरण