मुंबई - 'याआधी ईडीचे (प्रवर्तन निदेशालाय) नावदेखील कोणाला माहीत नव्हते, मात्र केंद्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता आली आणि ईडीचे नाव सर्वांना माहिती पडले. केंद्रात जोपर्यंत भारतीय जनता पार्टीची सत्ता राहील तोपर्यंत आमच्या जीवनातून ईडी जाणार नाही, असा टोला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारला लगावला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
हेही वाचा - विधानसभा अध्यक्ष येत्या अधिवेशनात निवडला जाणार, तर अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार - बाळासाहेब थोरात
'पुन्हा महाविकास आघाडी सरकार'
पुढे ते म्हणाले, की राज्यात जेव्हापासून महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले, तेव्हापासूनच भारतीय जनता पार्टीकडून हे सरकार अस्थिर करण्याचा किंवा पाडण्याचा प्रयत्न सुरू झाले होते. मात्र तरीही महाविकास आघाडी सरकार हे भक्कम आहे. तसेच 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले तर, आश्चर्य वाटण्याचे कारण नाही, असे संकेतही त्यांनी दिले.
हेही वाचा - विनायक मेटे मराठा समाजाच्या हिताचे बोलत नाहीत, बाळासाहेब थोरातांचा पलटवार
'भाजपाकडून राज्यपालांची दिशाभूल'
सदनात सदस्यांच्या उपस्थितीनुसार अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत निर्णय 5 आणि 6 जुलै रोजी राज्याचे पावसाळी अधिवेशन होणार आहे. याच अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात यावी. याबाबत राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. मात्र सध्या कोरोनाची परिस्थिती पाहता सर्व आमदारांची rt-pcr टेस्ट केली जाणार आहे. या टेस्टनंतर सदनामध्ये आमदारांची संख्या पाहूनच विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीबाबत निर्णय घेतला जाईल, असे पत्र मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना लिहिले आहे. त्यामुळे सदनामधील सदस्यांची उपस्थिती पाहूनच निवडणुकीचा निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र विधानसभा अध्यक्ष निवडणूक आणि ओबीसी आरक्षण तसेच अधिवेशनाचा कार्यकाळ याबाबत भारतीय जनता पार्टीकडून राज्यपालांना पत्र लिहिण्यात आले होते. असे पत्र लिहून भाजपा केवळ राज्यपालांची दिशाभूल करत असल्याची टीका, यावेळी त्यांनी केली.