मुंबई - राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार स्थिर असून त्याला कोणताही धोका नसल्याचे विधान महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. मात्र, काही लोक गैरसमज पसरवत आहेत. त्याची विरोधकांनी चिंता करू नये, अशी प्रतिक्रिया थोरात यांनी दिलीय.
काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतल्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्यासंबंधी चर्चांना उधाण आले. यावर बोलताना, राज्यात कोरोनाच्या संकटातून जनतेला बाहेर कसे काढता येईल, यावर सर्व मंत्र्यांचे लक्ष असून या भेटीगाठींचा कोणताही चुकीचा अर्थ काढू नये, असे थोरात यांनी स्पष्ट केले.
विरोधकांनी सुरू केलेला राजकीय गोंधळ चुकीचा आहे. या काळात जनतेला आणि सरकारला मदत करण्याऐवजी ते त्रास देत आहेत. यामुळे विरोधकांना जे काही राजकारण करायचे आहे, त्यासाठी आमची तयारी आहे, असे थोरत यांनी म्हटले. राज्यातील कोरोना संपल्यानंतर आम्हीही राजकारण करू. आम्हाला सध्या कोरोनाच्या कामातून डिस्टर्ब करू नका, असे थोरात यांनी सांगितले.
भाजप खासदार नारायण राणे यांनी राज्यपालांची भेट घेऊन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. त्यावर थोरात यांनी भाजपवर तोंडसुख घेतले. राज्यात भाजपची सत्ता येईल, आणि मंत्रिपद मिळेल, या आशेने अनेकजण अस्वस्थ झाले आहेत. ते अस्वस्थ असल्याच्या अपेक्षेने या प्रकारची विधाने करत असल्याचे ते म्हणाले. राज्यात संकटाचे वातावरण असताना सत्तेची पोळी भाजून घेण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, असे आवाहन त्यांनी केले. आमचे सरकार स्थिर असून महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली आम्ही एकत्र असल्याचा विश्वास, त्यांनी व्यक्त केलाय.