मुंबई - कोरोनाच्या काळात कोरोनाबाधित रुग्णांना तातडीने सेवा मिळून त्यांच्या नातेवाईकांच्या शंकाचे योग्य निरसन करण्यासाठी महापालिकेची 1916 हेल्पलाईन कार्यरत करण्यात आली. ही हेल्पलाईन सुरळीत सुरू ठेवण्यासाठी महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) चे कर्मचारी 24 तास सेवा बजावत आहेत.
कोविड रुग्णांना तात्काळ व कमी वेळेत सेवा देता यावी, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना सुरू होत्या. त्यावेळी महापालिका आयुक्त, पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्यात बैठक पार पडली. आणि त्यातून जलद सेवा देण्यासाठी हेल्पलाईन वॉर रूम स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातून 1916 याच हेल्पलाईन क्रमांकावर पालिकेच्या 24 प्रभागनिहाय तातडीने सेवा देण्याचा निर्णय झाला.
एकाच वेळी एका पीआरए लाईनद्वारे ही सेवा नुकतीच सुरू करण्यात आली असून एकावेळी 30 जणांना हेल्पलाइनवरील फोन अटेंड करणे शक्य झालं आहे. यासाठी एमटीएनएलचे कर्मचारी व 6 निवृत्त डेप्युटी जनरल मॅनेजर यांची पालिकेच्या झोननिहाय नेमणूक करण्यात आली आहे. हे सर्व कर्मचारी, अधिकारी 24 तास 7 दिवस सेवा देत आहेत.
या हेल्पलाईनवर फोन केल्यास संबंधित रुग्णाला तो राहत असलेल्या ठिकाणी असलेल्या खासगी, सरकारी व पालिका रुग्णालयातील बेडची माहिती मिळते. तसेच फोनवरुनही डॉक्टरांकडून शंकांचे निरसन केलं जाते आणि आवश्यक असल्यास संबंधित रुग्ण राहत असलेल्या ठिकाणी रुग्णवाहिकेतून डॉक्टर दारी पोहोचतो. त्यामुळे याआधी रुग्णांची होणारी फरफट आता कमी झाल्याचा दावा शिवसेना नेते व खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे.