मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सप्टेंबर-ऑक्टोबर २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीचा पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवार २० ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. हा निकाल www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार असून या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध होतील.
विद्यार्थ्यांनो असा पाहा निकाल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापुर अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत इ. दहावीची पुरवणी परीक्षा २२ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर व बारावीची पुरवणी परीक्षा १६ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. सदर परीक्षेचा निकाल २० ऑक्टोबर २०२१ रोजी म्हणजे (बुधवारी) दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. त्यानंतर
होमपेजवरील HSC, SSC supplementary result 2021 या ऑप्शनवर क्लिक करा
तुमचा रोल नंबर, आणि आईचे नाव टाका.
त्यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
गुणपडताळणी अर्ज करता येणार-
ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून विद्यार्थ्यांना आपल्या गुणांसंबंधी असलेल्या तक्रारी, उत्तरपत्रिकेच्या प्रती, स्थलांतर प्रमाणपत्रासाठीची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे. दहावी व बारावी पुरवणी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयाव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने अर्ज रपायचा आहे. यासाठी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून दहावीसाठी http://verification.mh-ssc.ac.in व इ. बारावीसाठी http://verification.mh-hsc.ac.in यावर जावे. यासाठी स्वतः किंवा शाळा / कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी/ शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत.
हेही वाचा - मृतावस्थेतील धाम नदीला मिळाले पुनर्जीवन; सीएसआरसह सामूहिक प्रयत्नांची जोड