मुंबई - देशभरात कोरोनाचा कहर सुरू असतानाच देशभरातील आयआयटी तसेच देशातील नामांकित अभियंत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी 'नॅशनल टेस्टिंग एजन्सी'कडून (एनटीए) १ ते ६ सप्टेंबर या कालावधीत घेण्यात आलेल्या जेईई-मेन्स या सामायिक प्रवेश परीक्षेचा निकाल शुक्रवारी रात्री उशिरा जाहीर झाला. या परीक्षेत देशभरातील २४ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाइल मिळवले आहेत. या परीक्षेचा निकाल एनटीएकडून संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यासोबत विद्यार्थी व पालकांना उत्तरपत्रिका पाहता येणार आहे.
देशभरात १ ते ६ सप्टेंबरदरम्यान जेईई मेन्स परीक्षा पार पडली. देशातील ८ लाख ६७ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ६ लाख ३५ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर २ लाख २० हजार विद्यार्थ्यांची कोरोना आणि संकटामुळे ही परीक्षा हुकली. तर नोंदणी करूनही ९५ हजाराहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला गैरहजर राहिले होते. राज्यातील ७४ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. तर देशभरात ६६० परीक्षा केंद्रावर या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
जेईई-मेन्स या परीक्षेला दोन लाख वीस हजार विद्यार्थी मुकले, अशी माहिती खुद्द केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी नुकतेच ट्विट करून दिली होती. तर दुसरीकडे या परीक्षेचे आयोजन कोरोनाच्या काळात विविध राज्यांनी अत्यंत सावधगिरीने केल्याने त्या राज्याबद्दल कौतुकही व्यक्त केले होते.