मुंबई - मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात (Corona Cases Control in Mumbai) आल्याने मुंबईतील निर्बंध आणखी शिथिल करण्यात आले आहेत. मुंबईतील नाईट कर्फ्यू (Night Curfew) हटवण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसेच मुंबईत आजपासून सुधारित नवी नियमावली (New Rules In Mumbai) जाहीर झाली आहे.
- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी -
मुंबईमध्ये डिसेंबर महिन्यापासून कोरोनाची तिसरी लाट आली. ही लाट महिनाभरातच आटोक्यात आल्याने पालिकेने कोरोना दरम्यान निर्बंध लागू केले होते. सध्या कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आल्याने राज्य सरकारने निर्बध शिथिल केले आहेत. त्याच अनुषंगाने मुंबईमधील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मुंबईमधील नाईट कर्फ्यू हटवण्यात आला आहे. चौपाट्या, पार्क, मैदाने, पर्यटन स्थळ मुंबईकरांसाठी खुली करण्यात आली आहेत.
- राज्यासह मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत घट -
मुंबईमध्ये मार्च २०२० पासून कोरोनाचा प्रसार आहे. या कालावधीत कोरोनाच्या आलेल्या दोन लाटा पालिकेने थोपवल्या होत्या. मात्र डिसेम्बरपासून पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली. डिसेंबरपासून कोरोनाची तिसरी लाट आली. ६ ते ८ जानेवारी दरम्यान दिवसाला २० हजार रुग्ण आढळून आले. तरीही ही लाट जानेवारीच्या शेवटी ओसरू लागली आहे. मुंबईप्रमाणेच राज्यातही रुग्णसाक्या कमी झाल्याने राज्य सरकारने निर्बंध शिथिल केले आहेत. त्याच अनुषंगाने मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी पत्रक काढत निर्बध शिथिल केले आहेत.
- नवे नियम -
मुंबई महापालिका आयुक्तांनी काढलेल्या पत्रकानुसार रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यत असलेला नाईट कर्फ्यू रद्द करण्यात आला आहे. चौपाट्या, पार्क, मैदाने मुंबईकरांसाठी खुली करण्यात आली आहेत. दिवसभरात कशीही याचा मुंबईकरांना वापर करता येणार आहे. स्विमिंग पूल, वॉटर पार्क, अम्युजमेंट पार्क, थीम पार्क ५० टक्के क्षमतेने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. भजन, स्थानिक सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम ५० टक्के क्षमतेने करता येणार आहेत. लग्नासाठी २५ टक्के क्षमतेने नागरिकांना उपस्थित राहता येणार आहे. ग्राऊंड आणि बँक्वेट हॉलमध्ये २०० च्या क्षमतेला परवानगी देण्यात आली आहे. खेळाच्या कार्यक्रमांना २५ टक्के क्षमतेने प्रेक्षकांना उपस्थित राहता येणार आहे. पर्यटनस्थळ आणि आठवडी बाजार खुले करण्यात आले आहेत.
- काय आहेत नवे नियम?
1) रात्रीची संचारबंदी उठवली
2) मुंबईतील सर्व पर्यटनस्थळं सुरु होणार
3) स्पा आणि सलून 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार
4) अंत्यसंस्काराला उपस्थितीची मर्यादा नसेल
5) चौपाट्या, गार्डन, पार्क सुरू होणार
6) स्विमिंग पूल, वॉटरपार्क 50 टक्के मर्यादेने सुरू
7) रेस्टॉरंट, थेटर्स, नाट्यगृहे 50 टक्के मर्यादेने सुरू
8) धार्मिक आणि करमणुकीच्या कार्यक्रमांना 50 टक्के उपस्थितीची परवानगी
9) लग्नासाठी 25 टक्के उपस्थितीची मर्यादा
10) खेळाच्या मैदानात 25 टक्के उपस्थितीची मर्यादा
11) भजन, स्थानिक सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम ५० टक्के क्षमतेने सुरू
12) अम्युजमेंट थीम पार्क ५० टक्के क्षमतेने सुरू
- मुंबईत ८०३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद
आज (1 फेब्रुवारी) मुंबईत ८०३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्के असून ८८०० सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत डिसेंबर महिन्यापासून कोरोना विषाणूची तिसरी लाट आली होती. ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होत आहे. मागील आठवड्यात सोमवार ते बुधवार असे सलग तीन दिवस १८०० च्या वर रुग्ण आढळून आले. त्यात घट होऊन काल सोमवारी ९६० रुग्णांची नोंद झाली.
आज मुंबईत १८०० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ४७ हजार ३९३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख १९ हजार ८८ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ६३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ८८८८ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ४८५ दिवस इतका आहे. मुंबईमधील ५ इमारती सील आहेत. २५ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत कोरोना वाढीचा दर ०.१४ टक्के इतका आहे.
- ९४.१ टक्के बेड रिक्त -
मुंबईत आज आढळून आलेल्या ८०३ रुग्णांपैकी ६५० म्हणजेच ८१ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. आज १५२ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. ३१ रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली आहे. मुंबईत रुग्णालयांमध्ये ३७,४८२ बेडस असून त्यापैकी २०३६ बेडवर म्हणजेच ५.४ टक्के बेडव रुग्ण आहेत. इतर ९४.६ टक्के बेड रिक्त आहेत.
- रुग्णसंख्या घटतेय -
मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ११ हजारावर गेली होती. जूनपासून त्यात घट होऊ लागली. १ डिसेंबरला कोरोनाचे १०८ नवे रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर त्यात वाढ हाऊ लागली. ६ जानेवारीला २०,१८१, ७ जानेवारीला २०,९७१, ८ जानेवारीला २०,३१८, त्यानंतर रुग्णसंख्या घटली असून ९ जानेवारीला १९४७४, १० जानेवारीला १३६४८, ११ जानेवारीला ११६४७, १२ जानेवारीला १६४२०, १३ जानेवारीला १३७०२, १४ जानेवारीला ११३१७, १५ जानेवारीला १०६६१, १६ जानेवारीला ७८९५, १७ जानेवारीला ५९५६, १८ जानेवारीला ६१४९, १९ जानेवारीला ६०३२, २० जानेवारीला ५७०८, २१ जानेवारीला ५००८, २२ जानेवारीला ३५६८, २३ जानेवारीला २५५०, २४ जानेवारीला १८५७, २५ जानेवारीला १८१५, २६ जानेवारीला १८५८, २७ जानेवारीला १३८४, २८ जानेवारीला १३१२, २९ जानेवारीला १४११, ३० जानेवारीला ११६०, ३१ जानेवारीला ९६०, १ फेब्रुवारीला ८०३ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.