मुंबई -कांदिवली पश्चिम मध्ये हिरानंदानी हेरिटेज क्लब या गृह संकुलात खासगी स्तरावर बनावट लसीकरण झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी फसवणूक झालेल्या नागरिकांना बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून अधिकृत लस देण्यात आली आहे. या सर्व नागरिकांना कांदिवली पश्चिम मध्ये महावीर नगर परिसरातील अॅमिनिटी मार्केटमध्ये विशेष लसीकरण मोहीम राबवून महापालिकेच्या वतीने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले.
कांदिवली येथील हिरानंदानी सोसायटीमधील बोगस लसीकरण प्रकरणात लस घेतलेल्याची माहिती मिळाल्यानंतर महानगरपालिकेने त्यांना लसीकरण केले आहे. कांदिवलीतील महावीर नगर परिसरातील अॅमिनिटी मार्केट महापालिका लसीकरण केंद्रावर या नागरिकांसाठी खास सत्र आयोजित करण्यात आले होते. पोलिसांकडून मिळालेल्या यादीनुसार ३९० नागरिकांना लस देण्यात येणार होती. मात्र यापैकी बहुसंख्य रहिवाशांनी आधीच्या बनावट लसीकरणाचे प्रमाणपत्र मिळाले नसल्याने यापूर्वीच लस घेतल्याचे समोर आले. त्यामुळे अद्याप लस न घेतलेले १२८ रहिवाशांचे लसीकरण शनिवारी करण्यात आले.
महापालिकेने पडताळणी करून बोगस लसीकरण प्रकरणातील ज्या नागरिकांना आता लस दिली आहे. त्यांना विहित नियमानुसार कालावधी पूर्ण होताच दुसरा डोस देण्यात येणार आहे. कांदिवलीमधील रहिवाशांना लस दिल्यानंतर आता उर्वरित आठ ठिकाणी बोगस लसीकरणाचा फटका बसलेल्या नागरिकांना लस देण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
काय आहे बोगस लसीकरण प्रकरण-
कांदिवली इथल्या हिरानंदानी हेरिटेज गृहसंकुलातल्या नागिरकांनी बोगस लसीकरणाबद्दलची तक्रार केली होती. या प्रकरणातनंतर मुंबईत विविध ठिकाणी सुरू असलेल्या बोगस लसीकरणाची प्रकरणे समोर आली आहेत. तपासात आरोपींनी २५ मे ते ६ जून दरम्यान १० शिबिरांचे आयोजन केले गेले होते. या दरम्यान २६०० लोकांना बोगस लस देण्यात आल्या. यातील ७०० जणांना कोणती लस दिली हे स्पष्ट झालेलं नाही. तर इतर जणांना नॉर्मल सलाईन वॉटर देण्यात आले आहे. असं विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितली होती.
या सर्व बोगस लसीकरणामागे शिवम हॉस्पिटलचा हात होता. या हॉस्पिटलमधून हा सर्व गैरप्रकार सुरू असल्याचे तपासात पुढे आल्यानंतर पोलिसांनी हे रुग्णालय सील करण्यासंदर्भात पोलिसांनी पालिकेशी पत्र व्यवहार केला आहे. या आरोपींना 1 लाख लस विकत घेण्यासाठी ५ ते ६ कोटींची गरज होती. यासाठी त्यांनी बोगस शिबीरे आयोजित केली होती. मात्र टार्गेट पूर्ण होण्यापूर्वीच त्यांचा भांडाफोड झाला.
पोलिसांनी यापूर्वी गुन्ह्यामध्ये सहभागी आरोपींनी लसींचा पुरवठा करण्यासाठी वापरलेली क्रीम रंगाची टोयोटा कोराला ही कार जप्त करण्यात आली आहे. तसेच गुन्ह्यातले मुख्य आरोपी महेंद्र प्रताप सिंह आणि मनीष त्रिपाठी यांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा उलघडा झाला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.