मुंबई - राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. सक्रिय रुग्णांचा आकडा वाढत आहे. अशावेळी कोरोनावर प्रभावी ठरत असलेल्या इंजेक्शनची मागणी ही वाढत आहे. या इंजेक्शनचा पुरेसा साठा राज्यात आहे, मात्र या इंजेक्शनचा दर आजही सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेर आहेत. त्यातच इंजेक्शनची घाऊक आणि किरकोळ विक्री किंमत यात मोठी तफावत आहे. त्यामुळे हे इंजेक्शन माफक दरात उपलब्ध करुन देण्यासाठी राष्ट्रीय औषध किंमत नियंत्रण प्राधिकरण (एनपीपीए)ने याच्या किंमती निश्चित कराव्यात यासाठी अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) एनपीपीला एक प्रस्ताव पाठवला आहे.
इंजेक्शन एकच पण किंमती अनेक -
कोरोनावर लस आली आहे. पण अजूनही कोरोनावर औषध आलेले नाही. असे असले तरी रेमडेसीवीर इंजेक्शन कोरोनावर प्रभावी ठरत असून मागील अनेक महिने त्याचा वापर केला जात आहे. तर या औषधाला मोठी मागणी आहे. सुरूवातीला या औषधाची उपलब्धता कमी होती. या औषधाची निर्मिती करणाऱ्या कंपन्या कमी होत्या. त्यामुळे रेमडेसीवीर सुरुवातीला खूपच महाग मिळत होते. त्यामुळे जुलैमध्ये त्याच्या किमती नियंत्रित करत हे इंजेक्शन 2200 रूपयात सरकारी-पालिका रुग्णालयाला उपलब्ध करून देण्यात येऊ लागले. तर पुढे इंजेक्शन निर्मिती करण्यासाठी अन्यही कंपन्या पुढे आल्या. तर सद्या विविध कंपन्याकडून वेगवेगळ्या किंमतीत विकले जात आहे. सिप्लाच्या 100 मि. ग्रॅ. इंजेक्शनची किंमत चार हजार रुपये, झायडस हेल्थकेअर 5400 रुपये, डॉ. रेडीज 5400 रुपये, मायलन 4,800 रुपये आणि ज्युबिलंट जेनेरिक 4700 रुपये अशा किंमती आहेत. या किंमतीत इंजेक्शन रुग्णांना उपलब्ध होते.
हे ही वाचा - आरोपपत्र रियाला अडकवण्यासाठी तयार केले गेलेले - वकील
घाऊक आणि किरकोळ किमतीत मोठी तफावत -
विविध कंपन्याच्या इंजेक्शनच्या किंमती वेगवेगळ्या आहेत. मात्र त्याचवेळी घाऊक विक्रेते आणि किरकोळ विक्रेते यांना हे इंजेक्शन 800 ते 1200 रुपयांत मिळते. म्हणजेच 800 ते 1200 रूपयात मिळणाऱ्या रेमडेसीवीर इंजेक्शनची किरकोळ विक्रेत्याकडून 4700 ते 5400 रुपयांत विकले जाते. ही तफावत बरीच मोठी आहे. त्यामुळे राज्य सरकारने किंमती कमी करण्याची सूचना पुढे आणली आहे. त्यानुसार एफडीएने एन पीपीएकडे रेमडेसीवीरच्या किंमती नियंत्रित करत त्या माफक दरात उपलब्ध करून द्याव्यात असा प्रस्ताव एफडीएने एनपीपीएला पाठवला आहे. आता एनपीपीए यावर नेमका काय आणि कधी निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा - 'राहुल गांधींनाच समज कमी, त्यांनी अमेठीच्या जनतेचा केला अपमान'