मुंबई - टाटा हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना सदनिका देताना, मूळ स्थानिक रहिवाशांसोबत ठेवू नये. त्याऐवजी वेगळी इमारत देण्यात यावी यामागे हीच भावना होती, असे स्थानिक आमदार अजय चौधरी यांनी सांगितले.
कायमस्वरूपी राहणाऱ्यांना घरे द्यावी
लालबाग येथील सुखकर्ता को.ऑप. हौ. सोसायटी व विघ्नहर्ता को ऑप. हौ. सोसायटी या म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतीत ७५० मराठी कुटूंब राहत आहेत. येथील रहिवाशी व संक्रमण शिबिरातील रहिवाशांना कायमस्वरूपी राहण्याकरिता देणे अपेक्षित होते. परंतू सदनिका त्यांना वितरित न करता कॅन्सरग्रस्त रूग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना राहण्याकरिता देण्याचा निर्णय गृहनिर्माण मंत्र्यांनी घेतला.
स्थानिकांचा विरोध
सध्या कोरोनाचा प्रार्दुभाव कॅन्सरग्रस्त रूग्णांमध्ये मोठया प्रमाणात होत आहे. त्यामुळे सोसायटीमधील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील कामगार स्व सदन, त्रिवेणी सदन, मेहता मेंशन, सिंधुदूर्ग इमारत, धरमशी मेंशन या इमारतीमधील रहिवाशांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिकांनी रस्त्यावर उतरून याचा तीव्र विरोध केला. स्थानिक आमदार, गृहनिर्माण मंत्री आणि सीईओ यांना पत्रव्यवहार केला. दरम्यान पाहणीसाठी आलेल्या सीईओंना रहिवाशांनी घेराव घातला. तसेच रुग्णांच्या नातेवाईकांची एकाच ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी. रहिवासी ठिकाणी करू नये, अशी मागणी केली.
'समन्वय साधायला हवा होता'
स्थानिक रहिवाशांच्या या व्यथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पोहोचवताना रहिवाशांसोबत रुग्णांच्या नातेवाईकांना ठेवू नये. त्याऐवजी भोईवाडा येथील बॉम्बे डाईग मिलवरील म्हाडा गृहसंकुलामधील तयार असलेली संपूर्ण इमारत कॅन्सरग्रस्त रूग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना राहण्याकरिता द्यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याचे स्थानिक आमदार अजय चौधरी यांनी सांगितले. मात्र, राष्ट्रवादीच्या निर्णयाला जाणीवपूर्वक विरोध केला नाही. कोरोनाचा काळ सुरू आहे. त्यामुळे सदनिका देण्यापूर्वी त्यांनी समन्वय साधला असता तर आज ही वेळ आली नसती, असेही चौधरी म्हणाले.
'मूळ रहिवाशांसोबत रुग्णांच्या नातेवाईकांना ठेवू नये'
आमच्या सोसायटीमध्ये १०० खोल्या कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांना दिल्या आहेत. घरे देताना एक रहिवासी खोली सोडून दोन कॅन्सरग्रस्त रुग्णाच्या नातेवाईकांना खोल्या दिल्या आहेत. याला पुर्णत: विरोध आहे. येथे मूळ रहिवासी राहतात. त्यामुळे संबंधित नातेवाईकांना त्यांच्यासोबत न ठेवता, वेगळी इमारत किंवा एखादा मजला देण्यात यावा, अशी मागणी होती. तसा पत्रव्यवहार करून व्यथा मांडली. परंतु, कोणीही एकूण घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. स्थानिक आमदारांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यांनी म्हणणे समजून घेत मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार केल्यानंतर आम्हाला दिलासा मिळाला आहे, असे स्थानिक रहिवासी निलक्षी चेंदवणकर यांनी सांगितले.
हेही वाचा - पुढच्या जन्मी अशी बायको नको रे बाबा!!! पुरुषांनी चक्क पिंपळाच्या झाडाची केली पूजा