मुंबई - विधानसभेच्या 288 आमदारांचा मुंबईत राहण्याचा प्रश्न् सोडविण्यासाठी मनोरा आमदार निवासाच्या पुनर्विकासाचे काम केले जात आहे. जुन्या मनोरा आमदार निवासाचे पाडकाम पूर्ण झाल्यानंतर बुधवारी सकाळी 11 वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नव्या मनोरा आमदार निवासाचे भूमिपूजन करण्यात आले.
आमदार निवासाच्या भूमीपूजन कार्यक्रमानंतर विधानभवनातील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात, मनोरा इमारत केवळ 25 वर्षांत तोडावी लागणे दुःखद असल्याची खंत विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केली. दिल्लीतील संसद भवनाला लवकरच 100 वर्षे पूर्ण होणार आहेत. तशाच प्रकारच्या इमारती बांधून राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान रोखावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
जवळजवळ 800 निवासांची व्यवस्था असलेले मनोरा आमदार निवास लवकरात लवकर पूर्ण होईल. या इमारतीचे कंत्राट एनबीसीसी कंपनीला देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.