मुंबई - राज्यात कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. मात्र, नवीन नोकरी शोधणाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा देण्याचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) करत आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ने मुंबई मेट्रोसाठी विविध पदांसाठीची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
mmrda.maharashtra.gov.in या वेबसाईटवर एकूण ११० पदांसाठीची जाहिरात एमएमआरडीएमार्फत प्रसिद्ध करण्यात आली आहे. एमएमआरडीएने टेक्निशिअन, ट्रेन ऑपरेटर, ज्युनियर इंजिनिअर, ट्रॅफिक कंट्रोलर आणि हेल्पर अशा विविध पदांसाठी ही प्रक्रिया असणार आहे. १५ हजारांपासून ते कमाल १ लाख २३ हजार रुपये वेतन या विविध पदांसाठी देण्यात येणार आहे. यामध्ये सर्वात जास्त पदे ही टेक्निशिअन या श्रेणीअंतर्गत भरण्यात येणार आहेत. 53 पद या श्रेणी अंतर्गत असणार आहेत. एकूण पदांमध्ये ट्रेन ऑपरेटर (१), ट्रॅफिक कंट्रोल (१), ज्युनिअर इंजिअर (स्टोर) (१) आणि हेल्पर (१) अशा पदांसाठी ही भरती आहे, तर उर्वरित पदे टेक्निशिअन वर्गवारीत विविध अभियांत्रिकी शाखे अंतर्गत आहेत.
यामध्ये सर्वाधिक पगार हा ट्रॅफिक कंट्रोलर आणि ज्युनिअर इंजिनिअर या पदांसाठी देण्यात येणार आहे. १ लाख २२ हजार ८०० रुपये इतका देण्यात आला आहे. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत. अर्ज करण्यासाठीची सुरुवात २७ जूनपासून ते २७ जुलैपर्यंत आहे. तर एमएमआरडीएच्या संकेतस्थळावर यासाठीची पात्रता व अटींबाबतची माहिती देण्यात आली आहे.