मुंबई - शहरात आज कोरोना विषाणूचे 1 हजार 240 रुग्ण नव्याने आढळून आले असून 41 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे मुंबईमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण रोज हजारोंच्या संख्येने आढळून येत असताना मुंबईकरांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. मुंबईमधून आतापर्यंत कोरोनाच्या 28 टक्के रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
मुंबईत आज कोरोना विषाणूचे 1 हजार 382 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 1240 रुग्ण गेल्या 24 तासात आढळून आले आहेत. तर 142 रुग्ण 18 ते 19 मे दरम्यान खासगी लॅबमध्ये करण्यात आलेल्या चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 25 हजार 317 वर पोहचला आहे. मुंबईत गेल्या 24 तासात कोरोनाच्या 41 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाने मृत्यू झालेल्यांचा आकडा 882 वर पोहचला आहे.
मुंबईमधून गेल्या 24 तासात कोरोनाच्या 285 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईमधून आतापर्यंत 6 हजार 751 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांपैकी 5 हजार 524 रुग्णांना पालिकेच्या तर 1 हजार 227 जणांना खासगी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईमधील एकूण रुग्णांच्या आकडेवारीच्या प्रमाणात डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची टक्केवारी 28 टक्के इतकी आहे.