पुणे - मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक २१ जानेवारी इ.स. २०१३ रोजी घेण्यात आला.
मराठी भाषा ही अतिशय सुंदर भाषा असून मराठी भाषा ही स्वतः साठी स्वयंसिद्ध अशी गोड भाषा आहे. मराठी भाषा दिना निमित्ताने साहित्य क्षेत्रातील विविध मान्यवरांनी शुभेच्छा देत मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे, असे देखील म्हणाले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ईटीव्ही भारतने उद्गीर येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संम्मेलनाचे नियोजित अध्यक्ष भारत सासणे, मराठी विश्वकोष मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दिक्षीत, जेष्ठ कवयित्री अरूणा ढेरे, प्रा. हरी नरके, महाराष्ट्र साहित्य परिषद मिलिंद जोशी आणि माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्याशी चर्चा केली.