मुंबई - कोरोना-टाळेबंदीमध्ये अनेकांनी घर घेण्याचे नियोजन पुढे ढकलले आहे. पण, आता सुलभरित्या सुलभ कर्ज घेत हक्काच्या घराचे स्वप्न साकार करणे शक्य होणार आहे. कारण, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेलया पतधोरणात ग्राहकांना अधिक गृहकर्ज मिळण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण तरतूद केली आहे. या तरतूदीमुळे ग्राहकांना घराच्या एकूण रकमेच्या अधिक गृहकर्ज मिळणार आहे.
आरबीआयचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी पतधोरण जाहीर केले. त्यांनी रेपो दर जैसे थे ठेवल्याचे जाहीर केले. तर त्याचवेळी गृहकर्जाच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण निर्णय जाहीर केल आहे.
असा होणार घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना फायदा
गृहकर्जाला 'रिस्क व्हेटेज'या विभागातून म्हणजे जोखीम श्रेणीतून वगळण्यात आले आहे. तर वैयक्तिक गृहकर्जाला 'लोन टू व्हॅल्यू (LVT) रेशो'ला जोडण्यात आले आहे. त्यामुळे घराच्या एकूण किंमतीच्या काही अधिक टक्के गृहकर्ज ग्राहकांना मिळणार आहे. त्यामुळे घरासाठी ग्राहकांना गृहकर्जाच्या माध्यमातून अधिक रक्कम उभी करणे सोपे होणार आहे. या निर्णयाचा नवीन ग्राहकांना फायदा होणार आहे. सर्वच उत्पन्न गटातील ग्राहकांना याचा लाभ मिळणार आहे. तर ही सवलत 31 मार्च 2022 पर्यंत असणार आहे.
गेल्या कित्येक महिन्यांपासून बांधकाम व्यवसाय मंदीची झळ सोसत आहे. सध्या हे क्षेत्र मंदीमधून हळूहळू सावरत आहे. केंद्र सरकारने मुद्रांक शुल्क कमी केल्याने त्याचा बांधकाम व्यावसायिकांना फायदा होत आहे. सणासुदीत गृह खरेदीचे प्रमाण वाढते. त्यामुळे यंदाही सणासुदीच्या काळात विक्री वाढेल, अशी बांधकाम विकसकांना आशा आहे. अशातच आरबीआयने स्थावर मालमत्ता क्षेत्राच्या आशा आज आणखी पल्लवित केल्या आहेत. गृहकर्ज अधिक मिळणार असल्याने खरेदीचे प्रमाण वाढेल, असे सांगत ऍनरॉक प्रॉपर्टी कन्सल्टंटचे अध्यक्ष अनुज पुरी यांनी आरबीआयच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
नाईट फ्रॅंक इंडियाचे अध्यक्ष शिरीष बैजल यांनीही आरबीआयच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. ते म्हणाले, की आरबीआयचे हे पाऊल सकारात्मक आहे. त्यामुळे नक्कीच ग्राहक आणि बांधकाम व्यवसायाला दिलासा मिळणार आहे. 'गृहकर्ज लोन टू व्हॅल्यू रेशो'ला 31 मार्च 2022 पर्यंत जोडण्यात आल्याने त्याचा फायदा गृहकर्जदारांना होणार आहे.