मुंबई - आदिपुरुष' सिनेमाबद्दल ( Adipurush movie ) चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.या सिनेमाचं दिग्दर्शन मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत यांनं केलं असल्यानं ही मराठी प्रेक्षकांसाठी नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. परंतु या चित्रपटात हिंदू देवदेवतांचे विडंबन ( Parody Hindu gods and goddesses in film ) केले गेले असल्याने या चित्रपटावर बंदी घालावी ( Ban Adipurush movies ) अशी मागणी भाजप प्रवक्ते राम कदम यांनी केली आहे.
काय म्हणाले राम कदम? आमच्या हिंदू देवदेवतांचे विडंबन असणारी फिल्म आम्ही आमच्या महाराष्ट्र भूमीत प्रदर्शित होऊ देणार नाही. काही फिल्म निर्मात्यांना आता याची सवयच झाली आहे. हिंदू देवदेवतांचे फिल्म मध्ये विडंबन करायचे, फुकटची पब्लिसिटी मिळवायची व कोट्यवधी रुपये कमवायचे. शरम वाटली पाहिजे तुम्हाला कोट्यवधी रुपये कमावण्यासाठी आमच्या देवदेवतांचे विडंबन करायचे आणि मग निरलज्यासारखी माफी मागायची. मग आम्ही सीन कट करतो असे सांगायचे, माफी मागायची. आता माफी नाही, सीन कट करायची नाटके नाहीत. हे सर्व ठरवून होत आहे.म्हणून अशा पद्धतीच्या फिल्म वर कायमची बंदी घातली पाहिजे. तसेच अशी फिल्म बनवणारी जी लोकं आहेत त्यांच्यावरही काही काळासाठी बंदी घालण्याची आवश्यकता आहे. इथून पुढे हिंदू देवदेवतांचे विडंबन आम्ही कधीही सहन करणार नाही, असेही राम कदम म्हणाले आहेत.
सिनेमा रामायणावर आधारित - गेल्या अनेक दिवसांपासून सातत्यानं चर्चेत असलेल्या 'आदिपुरुष' या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.या सिनेमात बाहुबली फेम प्रभास एका वेगळ्याच अंदाजामध्ये दिसत आहे. बाहुबलीनंतर प्रभासनं मोजकेच सिनेमे केले आहेत. आता ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष या सिनेमातून प्रभास पुन्हा एकदा पौराणिक भूमिकेत दिसणार आहे.या सिनेमात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास भगवान रामाच्या भूमिकेत दिसत आहे. तर क्रिती सैनन,सनी सिंग यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान दिसत आहे. 'आदिपुरुष' हा सिनेमा रामायणावर आधारित आहे.सिनेमाची घोषणा झाल्यापासून तो सातत्यानं वेगवेगळ्या कारणानं चर्चेत राहिला आहे.