मुंबई - काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजप नेते राम कदम यांची नार्को टेस्ट व्हावी अशी मागणी केली होती. त्यावर, आपली आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची नार्को टेस्ट करण्यास तयार असल्याचे म्हणत राम कदम यांनी सावंतांवर पलटवार केला आहे.
सुशांतसिंह प्रकरणात समोर आलेल्या विवेक मोईत्रा याचे राम कदमांशीही संबंध होते. कदमांचे बॉलिवूडमध्येही घनिष्ठ संबंध आहेत. तसेच, मोईत्रा याने राम कदमांना ड्र्ग्स पुरवठा केल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे, राम कदमांची नार्को टेस्ट केली जावी, अशी मागणी सचिन सावंत यांनी ट्विटद्वारे केली होती. सुशांतसिंह प्रकरणातीलच संदिप सिंग याने भाजप कार्यालयात ५३ वेळा फोन करुन कोणाशी, कशाबाबत चर्चा केली याबाबतही तपास केला जावा असेही सावंत यावेळी म्हणाले होते.
सावंतांच्या या आरोपावर बोलताना राम कदम म्हणाले, की छत्रपती शिवरायांना मानणारा मी मावळा आहे. उद्या नव्हे, तर या क्षणालाही सांगाल त्या ठिकाणी येण्यास मी तयार आहे. माझ्यासोबत माझ्या पूर्ण कुटुंबाची नार्को टेस्ट करण्यास मी तयार आहे. मात्र, सुशांतसिंह राजपूत प्रकरणात अडकलेले, केंद्र सरकारमधील मोठे नेते आणि मंत्री हे आपापली नार्को टेस्ट करायला तयार आहेत का? असा सवालही राम कदम यांनी उपस्थित केला आहे. यावर आता सावंत काय उत्तर देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हेही वाचा : फडणवीसच कंगणा आणि राम कदमांचे बोलविते धनी; सचिन सावंतांची टीका