मुंबई - राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेसकडून भाजपची मनधरणी करण्यावर भर दिला जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत नरमाईची भूमिका घेत, राज्यसभेचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सोमवारपर्यंत भाजप संजय उपाध्याय यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - आगामी निवडणुका नव्या ओबीसी अध्यादेशातील तरतुदींनुसार व्हाव्यात - खासदार सुनील तटकरे
- येत्या दोन दिवसात होणार निर्णय -
काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. काँग्रेसकडून रजनी पाटील तर भाजपकडून संजय उपाध्याय यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष राष्ट्रवादी आणि शिवसेनेने पाटील यांना पाठिंबा दर्शवला आहे. परंतु, काँग्रेसला निवडणूक बिनविरोध करायची आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भेट घेत, अर्ज मागे घेण्याची विनंती केली. फडणवीस यांनी पक्ष नेतृत्वाशी बोलून निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, आता भाजपकडून राज्यसभा पोटनिवडणुकीतून माघार घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपच्या काही प्रमुख नेत्यांनी बिनविरोध निवडणुकीच्या चर्चेचा सूर लावल्याची माहिती सूत्रांनी दिली. येत्या दोन दिवसात कोअर कमिटीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती भाजपच्या एका नेत्याने दिली.
- काँग्रेसची प्रतिक्रिया -
आतापर्यंतची महाराष्ट्राची परंपरा अशी आहे की, जेव्हा निधनासारखी घटना घडते, तेव्हा आपण निवडणुकीत एकमेकांना सहकार्य करून बिनविरोध निवडणूक करतो. पण मला खात्री आहे की विरोधी पक्ष म्हणून त्यांची काही भूमिका असली, तरी ते आपल्या परंपरेशी बांधिल राहतील आणि निवडणूक बिनविरोध करतील, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले होते.
हेही वाचा - राज्यात दिवाळीनंतर शाळेची घंटा वाजणार? - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संकेत