मुंबई - नवे सरकार स्थापन होऊनही महाराष्ट्राच्या राजकारणातील गोंधळ थांबण्याचे नाव घेत नाही. आता राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांची शिंदे सरकारमध्ये एंट्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ( Chief Minister Eknath Shinde ) या चर्चेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे. सध्या अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी संघटनेचे म्हणजेच मनसे विद्यार्थी सेनेचे प्रमुख आहेत. मनसे विद्यार्थी सेनेचे प्रमुख म्हणून ते राजकारणात सक्रिय झाले असून शिवसेनेचा गढ असलेल्या कोकणात सभा घेत आहेत.
ना विधानसभा ना विधान परिषद - मिळालेल्या माहितीनुसार, भाजपने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी संपर्क साधला आणि पुत्र अमित ठाकरे यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याची ऑफर दिली. अमित ठाकरे सध्या विधानसभा किंवा विधान परिषद सदस्य नाहीत. असे असतानाही त्यांना मंत्री करण्याचा निर्णय हा शिवसेनेतील ठाकरे कुटुंबाचा प्रभाव कमी करण्याचा आणखी एक प्रयत्न असू शकतो. भाजपने नुकतेच शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करून उद्धव ठाकरे यांना शह देण्याचा प्रयत्न केला आहे.
आदित्य ठाकरे यांना प्रतिस्पर्धी - शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपची बाजी अमित ठाकरेंवर आहे. गेल्या काही वर्षात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे शिवसेनेची सूत्रे हाती घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. इतकेच नाही तर, प्रशासकीय अनुभवासाठी ते वरळी विधानसभेतून आमदार झाले. पुढे मंत्री झाले. अशा परिस्थितीत अमित ठाकरे यांना मंत्रिमंडळात आणण्याच्या हालचाली आदित्य ठाकरे यांच्यासाठी थेट आव्हान म्हणून पाहिले जात आहे. अमित आणि आदित्य या दोघांनाही तरुणांना त्यांच्या कॅम्पमध्ये आणण्यासाठी युवा नेते म्हणून प्रोजेक्ट केले जात आहे.
मनसे नेते काय म्हणतात - याबाबत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना विचारले असता ते म्हणाले की, त्यांना अशा कोणत्याही प्रस्तावाची माहिती नव्हती. तशी कोणतीही चर्चा सध्या तरी सुरू नाही. मात्र, राज ठाकरेंनी ही ऑफर धुडकावून लावल्याची बातमी मनसेकडून येत आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून भाजपने महाराष्ट्राच्या राजकारणात एका बाणाने अनेकांवर निशाणा साधला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंचे शिवसेनेवरील नियंत्रणही आता संपुष्टात आले आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
हेही वाचा - Elections Postponed : राज्यातील नगरपरिषदा नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित