मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या माटुंगा परिसरातील राजगृह येथील झाडांच्या कुंड्यांची नासधूस करून इमारतीच्या काचा फोडणाऱ्या आरोपी उमेश जाधव यास अटक केल्यानंतर या संदर्भात आणखीन एका आरोपीचा माटुंगा पोलिसांकडून शोध घेतला जात होता. या संदर्भात पोलिसांचा तपास सुरू असताना कल्याण स्टेशन परिसरातील फुटपाथवर विशाल मोरे उर्फ विठ्ठल काण्या या आरोपीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असता, राजगृह नासधूस प्रकरणी आरोपीने गुन्हा कबुल केला आहे.
हेही वाचा - विरोधी पक्षनेत्यांचे दौरे, बैठकांना हजर राहण्यास सरकारी अधिकाऱ्यांना मनाई
राजगृह नासधूस प्रकरणी उमेश जाधव (35) या आरोपीला अटक केल्यानंतर या संदर्भात माटुंगा पोलीस मोबाईल सिडीआर व परिसरातील सीसीटीवीच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेत होते. आरोपीचा ओळख पटल्यानंतर तो कल्याण रेल्वे स्थानाकाबाहेरील फुटपाथवर फिरत असल्याचे कळताच पोलिसांनी सापळा रचून आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यावेळी आरोपीने या गुन्ह्यात सहभाग असल्याचे मान्य केले आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.