मुंबई - राज्यात कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग मंदावला असून हा कालावधी सात दिवसांवर गेला आहे. जागतिक आरोग्य संघटना, आयसीएमआर यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्य शासनामार्फत कोरोनाच्या प्रसारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. मुंबईत संस्थात्मक क्वारंटाईन वाढवण्यावर भर देण्याच्या सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महापालिकेला दिल्या आहेत. त्यासाठी शाळा, महाविद्यालये यांचा वापर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील कोरोना हॉटस्पॉटची संख्या १४वरून ५वर आणण्यात यश मिळाल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. आरोग्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे बुधवारी रात्री संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
संवादातील महत्वाचे मुद्दे
• कोरोना उपचारासाठी नविन तंत्रज्ञान आणले जात आहे. पीपीई किटची गरज भासू नये, यासाठी 'फोटो बूथ सिस्टिम'चा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी एक छोटी रुम केली जाईल, ज्यामध्ये फक्त एक व्यक्ती (डॉक्टर) उभी राहू शकेल. या रूमद्वारे रुग्णांची स्वॅब चाचणी करता येईल. यासाठी पीपीई किटची गरज नाही. मुंबईत असे १०० फोटोबूथ बसवण्यात येणार आहे.
• प्लाझ्मा थेरपीनुसार मुंबईत उपचाराचा प्रयोग केला जाणार आहे. बरे झालेल्या रुग्णांचे रक्तद्राव घेऊन ते कोरोनाच्या गंभीर रुग्णांना देऊन त्यांच्यामध्ये ॲण्टीबॉडीज वाढवण्याचे काम करतील.
• मुंबईत संस्थात्मक क्वारंटाईन वाढवण्याचे काम सुरू आहे. कमी जागेमुळे होम क्वारंटाईन शास्त्रीय पद्धतीने होत नाहीय. अशा वेळी दाट लोकवस्त्यांमधील नागरिकांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येईल. त्यासाठी शाळा, महाविद्यालयांमध्ये बेडची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत.
• महाराष्ट्रात दररोज सुमारे सात हजार कोरोना चाचण्या केल्या जातात. आज ७११२ चाचण्या पार पडल्या आहेत.
• कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी पूर्वी ३.१, त्यानंतर ५ आणि आता ७.१ दिवसांवर गेला आहे. हा कालावधी आणखी वाढवण्याचे उद्दिष्ट आहे.
• राज्यात दररोज १३ टक्के लोकांना डिस्चार्ज देण्यात येतो. सध्या फक्त एक टक्के रुग्ण अत्यावस्थ आहेत. ८३ टक्के लोकांना लक्षणे नाहीत, तर १७ टक्के लोकांना सौम्य स्वरुपाची लक्षणे आहेत.
• महाराष्ट्रात सुरुवातीला कोरोनाचे १४ हॉटस्पॉट होते. आता तेथे रुग्ण नसल्यामुळे त्यांची संख्या कमी करत पाच वर आली आहे. मुंबई महानगर परिसर, पुणे परिसर, नागपूर, नाशिक, असे हॉटस्पॉट असून मालेगाववर देखील विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे.
• कोरोनामुळे होणारा मृत्यूदर देखील ७ वरून सरासरी पाच वर आला आहे. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा अभ्यास करण्यासाठी दोन समित्या नेमल्या आहेत.
• कोरोनाशी लढताना आरोग्य यंत्रणा अहोरात्र झटत आहे. चाचण्या केल्या जात आहेत, सर्वेक्षण होत आहे. आयसोलेशन आणि क्वारंटाईन केले जात आहे. रुग्ण दुपटीचा दर सात दिवसांवर गेलाय. त्यामुळे राज्यातील चित्र आशादायी आहे. लोकांनी घाबरू नये.