मुंबई - पोटनिवडणुकीत पराभव झाल्यावरही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिली जाईल असे जाहीर केले होते. मात्र आता युती आणि महा आघाडीमुळे राजकीय समीकरणे बदलल्याने गावित यांना उमेदवारी द्यावी असा आग्रह भाजपकडून होत आहे. त्यामुळे शिवसेनेत राजेंद्र गावित यांचा पक्षप्रवेश करून शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. तर श्रीनिवास वनगा यांचे विधानसभेत पुर्नवसन केले जाणार आहे
पालघरचे भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत जोरदार संघर्ष झाला होता. या पोटनिवडणुकीत वनगा यांच्या कुटुंबियांवर अन्याय होत असून त्यांच्या मुलाला उमेदवारी मिळावी यासाठी शिवसेना आग्रही होती. भाजपने काँग्रेसचे माजी आमदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली होती. त्या पोटनिवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळाली. मात्र आता त्याच शिवसेनेने यु टर्न घेत श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी न देता काँग्रेसमधून आलेल्या भाजपच्या राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे.
महाआघाडीने पालघरची जागा आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला सोडली आहे. आज श्रीनिवास वनगा मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत.