मुंबई - आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे कामाला लागल्याचे पाहायला मिळत आहे. मनसेचा बालेकिल्ला राहिलेल्या पुणे, नाशिकमध्ये राज ठाकरे यांनी दौऱ्यांची मालिकाच सुरू केली आहे. या दौऱ्यात पदाधिकाऱ्यांच्या बैठका, संघनात्मक बदल, स्थानिक समस्यांवर चर्चा आदी मुद्द्यांवर राज ठाकरे भर देत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशावेळी राज ठाकरे यांनी आता आपला मोर्चा मुंबईकडे वळवला आहे. 23 ऑक्टोबरला भांडुपमध्ये राज ठाकरे पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहेत.
मनसे हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरपणे पुढे घेऊन जाणार..?
मनसेने नवीन झेंडा आणि नवीन अजेंडा स्वीकारल्यानंतर हिंदुत्वाची कास धरलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून मनसेकडून हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरपणे लावून धरला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. आगामी पालिका निवडणुकीतही मनसे हाच मुद्दा लावून धरण्याची शक्यता आहे. हिंदुराष्ट्राच्या मजबूत बांधणीसाठी गुरु मा कांचन गिरी सोमवारी (दि. 18) राज ठाकरे यांची मुंबईत भेट घेणार आहेत. त्यामुळे मनसे हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरपणे पुढे घेऊन जात आहे का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. भाजपशी जुळवून घेण्यासाठी मनसेकडून हा आटापिटा केला जात असल्याचेही बोलले जात आहे.
मुंबई महापालिकेसाठी मनसेने कसली कंबर
मुंबई महापालिकेत मागील निवडणुकीत मनसेचे 7 नगरसेवक निवडून आले होते. यातील 6 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे मनसेचा फक्त एक नगरसेवक आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेसाठी मनसेने सहा महिन्यांपूर्वीपासूनच कंबर कसली आहे. सर्व नेत्यांना विभागवार जबाबदारी देण्यात आली आहे. त्यात अमित ठाकरे यांचाही समावेश आहे. 2017 च्या महापालिका निवडणुकीत मनसे मुंबईत एकूण 40 वॉर्डात दुसऱ्या क्रमांकावर होती. त्यामुळे मनसेकडून आता अधिक जोर लावला जात असल्याचे पाहायला मिळत आहे.
हेही वाचा - सर्वांना गर्व होईल असे काम करून दाखवणार.. समुपदेशनात आर्यन खानचा एनसीबीला शब्द