मुंबई - राज्यात आगामी महानगर पालिका निवडणुकीचा बिगुल काही दिवसांत वाजणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामाला लागली आहे. पुणे आणि नाशिक नंतर राज ठाकरे आज मुंबईतील भांडुप येथे पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार होते. मात्र, राज यांची प्रकृती ठीक नसल्याने हे पदाधिकारी मेळावे रद्द करण्यात आले आहेत. मनसेच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
हेही वाचा - अमरिंदर सिंग यांच्या मैत्रिणीवरून पंजाबमध्ये घमासान; कोण आहे अरुसा आलम?
आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भांडुप येथे तर, उद्या पुण्यामध्ये पदाधिकाऱ्यांचे मेळावे होणार होते. हे मेळावे अचानक रद्द करण्यात आले आहेत. या मेळाव्याला खुद्द राज ठाकरे संबोधित करणार असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले होते. मात्र, राज यांची प्रकृती बरी नसल्याने हे मेळावे पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
पुढील मेळाव्याची तारीख लवकरच करू जाहीर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शनिवारी मुंबईत, तर रविवारी पुणे येथे होणारा शाखा अध्यक्षांचा मेळावा काही अपरिहार्य कारणांमुळे पुढे ढकलण्यात आला आहे. पुढील मेळाव्याची तारीख, वेळ व ठिकाण लवकरच जाहीर करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी, अशी माहिती मनसे सचिव सचिन मोरे यांनी दिली.
जोरदार तयारी
इशान्य मुंबईतील भांडुप हा मनसेचा बालेकिल्ला समजला जायचा. या ठिकाणी मनसे प्रमुख राज ठाकरे येणार असल्याने कार्यकर्ते आनंदात होते, जोरदार वातावरण निर्मिती देखील या भागांमध्ये करण्यात आली होती. जागोजागी राज ठाकरे यांच्या स्वागताचे फलक लावण्यात आले होते. मात्र, अचानक मेळावे रद्द झाल्यामुळे कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे.
हेही वाचा - जणू काही संपूर्ण जगातील अमली पदार्थ केवळ महाराष्ट्रातच - उद्धव ठाकरे